मुंबई : पुनरागमन कसे करायचे याचा उत्तम वस्तुपाठ यावेळी सुरेश रैनाने दाखवून दिला. रैनाने यावेळी दिल्ली कॅपिटल्सच्या गोलंदाजीवर जोरदार प्रहार करत आपले अर्धशतकी साकारले. त्याचबरोबर अखेरच्या षटकांमध्ये सॅम करन आणि रवींद्र जडेजा यांनी तुफानी फटकबाजी करत संघाला १८८ धावांचा डोंगर उभारून दिला. चेन्नईचे फलंदाज एकामागून एक बाद होत असताना मात्र रैना धडाकेबाज फटकेबाजी करत होता. दिल्लीच्या एकाही गोलंदाजाला त्याने सोडले नाही आणि त्यांच्या गोलंदाजीवर धावांची जोरदार लूट केली. रैनाने यावेळी षटकार फटकावत आपले अर्धशतकही यावेळी साजरे केले. पण अर्धशतक झळकावल्यावर रैनाला मात्र मोठी खेळी साकारता आली नाही. कारण जडेजाबरोबर खेळत असताना रैना रनआऊट झाला. पण बाद होण्यापूर्वी रैनाने यावेळी ३६ चेंडूंत तीन चौकार आणि चार षटकारांच्या जोरावर ५४ धावा केल्या. दिल्ली कॅपिटल्सने यावेळी नाणफेक जिंकली आणि चेन्नईला प्रथम फलंदाजी करण्यासाठी पाचारण केले. चेन्नईच्या ऋतुराज गायकवाडने यावेळी चौकारासह डावाची चांगली सुरुवात केली. पण त्यानंतर फॅफ ड्यू प्लेसिस बाद झाला आणि चेन्नईला पहिला धक्का बसला. फॅफला यावेळी भोपळाही फोडता आला नाही. चौकाराने सुरुवात करणाऱ्या ऋतुराजलाही यावेळी मोठी धावसंख्या साकारता आली नाही. ऋतुराज पाच धावांवर असताना त्याला दिल्लीच्या ख्रिस वोक्सने बाद केले. ऋतुराज आणि फॅफ हे दोघेही सलामीवीर स्वस्तात बाद झाल्यावर मात्र सुरेश रैना फलंदाजीला आला आणि त्यानंतर चेन्नईची धावगती चांगलीच वाढायला लागली. रैनाने यावेळी सुरुवातीला मोइन अलीबरोबर चांगली भागीदारी रचली. मोइननेही यावेळी चांगले फटकेबाजी करत २४ चेंडूंत ३६ धावांची भर घातली. या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी यावेळी ५३ धावांची भागीदारी रचली. मोइन बाद झाल्यावर रैना आणि अंबाती रायडू यांच्यामध्ये चौथ्या विकेटसाठी अर्धशतकी भागादारी पाहायला मिळाली. रैनाने यावेळी षटकारासह आपले अर्धशतकही साकारले. पण रायुडू यावेळी २३ धावाच करू शकला. दिल्लीकडून पदार्पण करणाऱ्या टॉम करनने त्याला बाद केले. रैना बाद झाल्यावर कर्णधार महेंद्रसिंग धोनी फलंदाजीला आला. पण धोनी यावेळी शून्यावर बाद झाला.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2PKr2Q4
No comments:
Post a Comment