अहमदाबाद : कोलकाता नाइट रायडर्सने आज पंजाब किंग्सवर विजय मिळवला. या विजयासह गुणतालिकेत तळाला असलेल्या केकेआरने गुणतालिकेत मोठा बदल केल्याचे पाहायला मिळाले. या सामन्यापूर्वी केकेआरचा संघ हा गुणतालिकेत आठव्या स्थानावर होता. पण या विजयानंतर गुणतालिकेत त्यांची मोठी झेप घेतली आहे. या सामन्यापूर्वी केकेआरच्या संघाने पाच सामने खेळले होते आणि त्यांना चार सामन्यांमध्ये पराभव पत्करावा लागला होता. त्यामुळे एका विजयामुळे त्यांना गुणतालिकेत आठवे स्थान पत्करावे लागले होते. पण या विजयानंतर मात्र केकेआरने गुणतालिकेत मोठा बदल करत पाचवे स्थान पटकावले आहे. या सामन्यापूर्वी पंजाबचा संघ हा पाचव्या स्थानावर होता आणि पराभवानंतर त्यांची सहाव्या स्थानावर घसरण झाली आहे. पंजाबच्या १२४ धावांच्या माफक आव्हानाचा पाठलाग करताना केकेआरची सुरुवात चांगली झाली नाही. केकेआरची पहिल्या तीन षटकांमध्येच ३ बाद १७ अशी दयनीय अवस्था झाली होती. यावेळी प्रत्येक षटकात केकेआरले प्रत्येकी एक धक्का बसला होता. पण त्यानंतर राहुल त्रिपाठी आणि कर्णधार इऑन मॉर्गन यांच्यामध्ये चौथ्या विकेटसाठी ६६ धावांची भागीदारी झाली आणि त्यांनी केकेआरच्या संघाची पडझड थांबवली. ही जोडी आता केकेआरला विजय मिळवून देईल, असे वाटत होते. पण त्यावेळी एक चुकीचा फटका त्रिपाठीने खेळला आणि तो बाद झाला. त्रिपाठीने यावेळी ३२ चेंडूंत सात चौकारांच्या जोरावर ४१ धावांची खेळी साकारली. त्रिपाठी बाद झाल्यावर आंद्रे रसेल फलंदाजीला आला. पण यावेळी गरज नसताना रसेल चोरटी धाव घ्यायला गेला आणि धावचीत झाला. रसेलला यावेळी १० धावांवर समाधान मानावे लागले. कोलकाताने यावेळी नाणेफेक जिंकली आणि पंजाबला प्रथम फलंदाजी करण्यासाठी पाचारण केले. यावेळी पंजाबच्या सलामीवीरांनी संयत सुरुवात केली खरी, पण पहिली विकेट पडल्यावर मात्र एकामागून एक त्यांचे फलंदाज बाद होत गेले. पंजाबचा कर्णधार लोकुश राहुल हा १९ धावांवर बाद झाला आणि त्यांच्या संघाला पहिला धक्का बसला. राहुल बाद झाल्यावर पंजाबचे फलंदाज एकामागून एक बाद होत गेले. ख्रिस गेलला यावेळी भोपळाही फोडता आला नाही. धडाकेबाज फलंदाज दीपक हुडाला यावेळी एका धावेवरच समाधान मानावे लागले. त्यानंतर मोइसेस हेनरिक्स आणि शाहरुख खान यांनाही मोठी खेळी साकारण्यात अपयश आले. पण ख्रिस जॉर्डनने अखेरच्या षटकांमध्ये जोरदार फटकेबाजी केल्यामुळे पंजाबला सन्मानजनक धावसंख्या उभारता आली. जॉर्डनने यावेळी १८ चेंडूंत एक चौकार आणि दोन षटकारांच्या जोरावर ३० धावा केल्या. केकेआरकडून यावेळी सर्वाधिक तीन विकेट्स या वेगवान गोलंदाज प्रसिध कृष्णनने घेतल्या.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3gF3t61
No comments:
Post a Comment