चेन्नई : चेन्नई सुपर किंग्सने आजच्या सामन्यात केकेआरवर १८ धावांनी विजय मिळवला. पण त्याचबरोबर चेन्नईच्या संघाने गुणतालिकेत आरसीबी आणि दिल्ली कॅपिटल्स या दोन्ही संघांना धक्का दिल्याचे पाहायला मिळाले आहे. त्यामुळे चेन्नईच्या संघाने गुणतालिकेत मानाचे स्थान पटकावले आहे. या सामन्यापूर्वी चेन्नईचा संघ तीन सामने खेळला होता. या तीन सामन्यांमध्ये त्यांना दोन विजय मिळवता आले होते आणि एका सामन्यात त्यांचा पराभव झाला होता. त्यामुळे आजचा सामना चेन्नईच्या संघाने जिंकला आणि त्यांचे सहा गुण झाले आहे. गुणतालिकेत आरसीबी आणि दिल्ली कॅपिटल्सच्या संघाचेही समान सहा गुण आहेत. पण चेन्नईचा नेट रनरेट हा आरसीबी आणि दिल्लीपेक्षा जास्त असल्याने त्यांनी अव्वल स्थान पटकावले आहे. चेन्नईने या सामन्यात केकेआरपुढे २२१ धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना केकेआरची पहिल्याच पॉवर प्लेमध्ये ५ बाद ३१ अशी दयनीय अवस्था झाली होती. पण त्यानंतर आंद्रे रसेल आणि दिनेश कार्तिक यांची चांगलीच जोडी जमली. रसेलने यावेळी २१ चेंडूंत आपले अर्धशतक साकारले. पण अर्धशतक झळकावल्यावर रसेलला जास्त काळ खेळपट्टीवर ठाण मांडता आला नाही. सॅम करनचा एक चेंडू सोडण्याच्या नादात रसेल बाद झाला आणि केकेआरला मोठा धक्का बसला. रसेलने यावेळी २२ चेंडूंत तीन चौकार आणि सहा षटकारांच्या जोरावर ५४ धावांची खेळी साकारली. रसेल बाद झाला असला तरी त्यानंतर पॅट कमिन्सने चेन्नईच्या गोलंदाजांची पळता भूई थोडी केली होती. कार्तिक बाद झाल्यावरही कमिन्सने आपली बॅट म्यान केली नाही. कमिन्सने दमदार फटकेबाजी केल्यामुळेच हा सामना अखेरच्या षटकापर्यंत गेला होता. पण अखेरच्या षटकात दुहेरी धाव घेताला प्रसिध कृष्णन धावचीत झाला आणि चेन्नईने १८ धावांनी सामना जिंकला. कमिन्सने यावेळी ३४ चेंडूंत चार चौकार आणि सहा षटकारांच्या जोरावर नाबाद ६६ धावांची धडाकेबाज खेळी साकारली. फॅफ ड्यु प्लेसिसच्या नाबाद ९५ धावा आणि ऋतुराज गायकवाडच्या अर्धशतकाच्या जोरावर चेन्नईने प्रथम फलंदाजी करताना २२० धावा फटकावल्या होत्या. ऋतुराजने यावेळी ४२ चेंडूंत सहा चौकार आणि चार षटकारांच्या जोरावर ६४ धावांची धडेकाबाज खेळी साकारली. ऋतुराज आणि फॅफ यांनी यावेळी ११५ धावांची सलामी दिली. फॅफने अखेरच्या षटकापर्यंत दमदार फलंदाजी केली, पण त्याचे शतक यावेळी फक्त पाच धावांनी हुकले.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3dBGIy4
No comments:
Post a Comment