नवी दिल्ली : दिल्ली कॅपिटल्सच्या संघाने आजच्या सामन्यात केकेआरवर दणदणीत विजय साकारला. या विजयासह दिल्लीच्या संघाने गुणतालिकेत आरसीबीच्या संघाला मोठा धक्का दिला आहे. दिल्लीच्या संघाने या विजयानंतर गुणतालिकेत सर्वाधिक १० गुण पटकावले आहेत. पृथ्वी शॉ याने यावेळी ४१ चेंडूंत ११ चौकार आणि तीन षटाकारांच्या जोरावर ८२ धावांची भागीदारी रचत दिल्लीच्या विजयात सिंहाचा वाटा उचलला. या सामन्यापूर्वी दिल्लीच्या संघाने सहा सामन्यांमध्ये चार विजय मिळवले होते, तर दोन सामन्यांमध्ये त्यांना पराभव पत्करावा लागला होता. पण या विजयानंतर दिल्लीच्या संघाने १० गुण झाले आहेत. गुणतालिकेत सध्याच्या घडीला दिल्ली, चेन्नई आणि आरसीबी या तिन्ही संघांचे समान १० गुण आहेत. पण सर्वाधिक रनरेटच्या जोरावर चेन्नईने अव्वल स्थान पटकावले आहे. या विजयानंतर दिल्लीने आरसीबीला गुणतालिकेत धक्का दिला असून त्यांनी दुसरे स्थान पटकावले आहे, तर आरसीबीच्या संघाची तिसऱ्या स्थानावर घसरण झाली आहे. केकेआरच्या १५५ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना दिल्ली कॅपिटल्सने झोकात सुरुवात केली.खासकरून सलामीवीर पृथ्वी शॉने यावेळी पहिल्याच षटकात तब्बल सहा चौकार वसूल केले आणि २४ धावांची लूट केली. त्यानंतरही पृथ्वी तुफानी फटकेबाजी करत होता. पृथ्वीने यावेळी फक्त १८ चेंडूंत आपले अर्धशतक पूर्ण केले. अर्धशतक झळकावल्यावरही पृथ्वी दमदार फटकेबाजी करत होता. पृथ्वीला यावेळी सलामीवीर शिखर धवनने चांगली साथ दिली. धवनने यावेळी ४७ चेंडूंत ४६ धावा केल्या आणि ऑरेंज टकॅप पुन्हा एकदा पटकावली. दिल्लीच्या संघाने या सामन्यात नाणेफेक जिंकली आणि केकेआरला प्रथम फलंदाजी करण्यासाठी पाचारण केले. यावेळी दिल्लीच्या गोलंदाजांनी चांगला मारा केला आणि केकेआरला मोठा धावसंख्या करण्यापासून रोखले. पण केकेआरकडून यावेळी शुभमन गिल आणि आंद्रे रसेल यांनी धडाकेबाज फलंदाजी केली. गिलने यावेळी तीन चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर ४३ धावांची खेळी साकारली. पण गिलला यावेळी दुसऱ्या टोकाकडून चांगली साथ मिळाली नाही. गिल बाद झाल्यानंतर आपल्या वाढदिवशी रसेलने धडाकेबाज फटकेबाजी केली. रसेलने यावेळी २७ चेंडूंत दोन चौकार आणि चार षटकारांच्या जोरावर नाबाद ४५ धावांची खेळी साकारली. त्यामुळेच केकेआरच्या संघाला १५४ धावा करता आल्या.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3vxHkdZ
No comments:
Post a Comment