पुणे, : पहिला सामना सुरु व्हायला अजून बराच अवधी शिल्लक असला तरी भारताचा कर्णधार विराट कोहलीने संघाची सलामीची जोडी कोण असेल, हे जाहीर केले आहे. त्यामुळे आता रोहित शर्माबरोबर सलामीला भारताचा कोणता फलंदाज येणार, हे निश्चित झाले आहे. इंग्लंडविरुद्धच्या ट्वेन्टी-२० मालिकेत सलामीच्या बऱ्याच जोड्या पाहायला मिळाल्या होत्या. पहिल्यांदा शिखर धवन आणि लोकेश राहुल यांना संधी दिली त्यानंतर दुसऱ्या सामन्यात धवनला वगळून इशान किशनला संधी दिली होती आणि त्याने अर्धशतक झळकावले होते. पण तिसऱ्या सामन्यात रोहित शर्माचे संघात पुनरागमन झाले आणि रोहितबरोबर लोकेश राहुल सलामीला आला होता. त्यावेळी इशान किशनला तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी पाठवण्यात आले होते. चौथ्या सामन्यात पुन्हा एकगा रोहित आणि राहुल हे दोघेच सलामीला आले होते. पण त्यानंतर पाचव्या सामन्यात तर सर्वांनाच धक्का बसला. कारण पाचव्या सामन्यात रोहितबरोबर चक्क कर्णधार विराट कोहली हा सलामीला आला होता. त्यामुळे आता वनडे मालिकेत भारताच्या सलामीची धुरा कोण वाहणार, याची उत्सुकता सर्वांनाच असेल. याबाबत कोहली म्हणाला की, " रोहित शर्मा आणि शिखर धवन हे पहिल्या वनडेमध्ये सलामीला येतील, हे निश्चित झाले आहे. जेव्हा वनडे क्रिकेटसाठी संघ निवडण्याची वेळ येते, तेव्हा मनामध्ये कुठलाही संभ्रम नसतो. कारण रोहित आणि धवन हे गेल्या काही वर्षांपासून चांगली सलामी संघाला देत आहेत. गेल्या सामन्यात मी सलामीला आलो होतो, पण ती एक रणनिती होती. जर सूर्यकुमार यादवला बढती द्यायची असेल किंवा वरच्या स्थानावर खेळवायचे असेल तर त्यासाठी काही प्रयोग नक्कीच करावे लागतील." कोहली पुढे म्हणाला की, " रोहित आणि मी आतापर्यंत फलंदाजीचा चांगला अनुभव घेतला आहे. आम्ही एकत्रपणे बरीच फलंदाजी केली आहे. पण यापुढे आम्ही दोघे सलामीलाच येऊ, हे मात्र सांगता येऊ शकत नाही. सर्व स्थानांवर फलंदाजी करता यावी, यासाठी मी ही गोष्ट करत आहे. कारण मी जर सलामीला येऊ शकलो तर सूर्यकुमारसारख्या फलंदाजाला न्याय मिळू शकेल किंवा वरच्या स्थानावर फलंदाजी करता येऊ शकेल. त्यामुळे कोणतीही भूमिका निभावण्यासाठी मला सक्षम असायला हवे, असे मलातरी वाटते."
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3c9VzPk
No comments:
Post a Comment