पुणे, : रोहित शर्माला पहिल्या एकदिवसीय सामन्यात दुखापत झाली होती. त्यामुळे आता तो दुसऱ्या सामन्यात खेळू शकणार नाही, असे म्हटले जात आहे. पण जर रोहित खेळणार नसेल तर त्याच्याजागी सलामीला कोणाला पाठवायचे हा प्रश्न भारतीय संघापुढे नक्कीच असेल. सध्याच्या घडीला भारतीय संघापुढे सलामीसाठी चार महत्वाचे पर्याय असल्याचेही पाहायला मिळत आहे. रोहित जर खेळणार नसेल तर शिखर धवनबरोबर विराट कोहलीही सलामीला येऊ शकतो, अशी शक्यता आहे. कारण यापूर्वी जेव्हा ट्वेन्टी-२० मालिकेत सलामीवीराचा प्रश्न उपस्थित झाला होता त्यावेळी विराट रोहितबरोबर सलामीला आला आहे. सलामीला येत कोहलीने मोठी खेळीही साकारली होती. त्यामुळे कोहली यावेळी धवनबरोबर सलामीला येण्याची शक्यता आहे. पण कोहली ही जोखीम उचलणार का, हा सर्वात मोठा प्रश्न असेल. जर कोहली सलामीला येण्यासाठी इच्छुक नसेल तर सलामीला युवा शुभमन गिलला पाठवण्यात येऊ शकते. कारण गिलने भारतासाठी ऑस्ट्रेलियामध्ये सलामीची जबाबदारी पार पाडली होती. सलामीला येत गिलने चांगल्या धावाही केल्या होत्या. त्यामुळे गिलचा विचार यावेळी सलामीसाठी करण्यात येऊ शकतो.त्यामुळे गिल आता एकदिवसीय सामन्यात भारताकडून पदार्पण करणार का, याची उत्सुकता चाहत्यांना नक्कीच असेल. लोकेश राहुल हादेखील भारतासाठी सलामीचा एक चांगला पर्याय सध्याच्या घडीला उपलब्ध आहे. कारण राहुलने यापूर्वीही भारतासाठी सलामी केलेली आहे. त्यामुळे राहुलसाठी ही एक चांगली संधी असेल. पण राहुल सलामीला येऊन यष्टीरक्षणही करू शकेल का, हे पाहावे लागेल. जर राहुल सलामीला आला आणि त्याने यष्टीरक्षण करण्यास नकान दिला तर संघात रिषभ पंतचीही निवड करण्यात येऊ शकते. त्यामुळे हा पर्यायही भारतीय संघासाठी खुला असेल. सूर्यकुमार यादव हा सध्याच्या घडीला चांगल्या फॉर्मात आहे. त्यामुळे त्याचा विचारही यावेळी सलामीसाठी करण्यात येऊ शकतो. कारण सूर्यकुमार तिसऱ्या स्थानावर येऊन चांगली फलंदाजी करु शकतो, हे सर्वांनीच पाहिले आहे. त्यामुळे त्याचा विचारही यावेळी सलामीसाठी करण्यात येऊ शकतो.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3vWiPbF
No comments:
Post a Comment