पुणे, : भारतीय संघ सध्याच्या घडीला जोरदार फॉर्मात आहे. भारताने ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडसारख्या मात्तबर संघांना धुळ चारली आहे. पण भारताचे भविष्यही उज्वल असल्याचे म्हटले जात आहे. भारताच्या भविष्याबाबत इंग्लंडच्या एका खेळाडूने सुचक वक्तव्य केलं आहे. कर्णधार विराट कोहली आणि उपकर्णधार रोहित शर्मा यांच्यापेक्षा दुसराच एक खेळाडू भारताचे भविष्य असल्याचे या खेळाडूने सांगितले आहे. इंग्लंडचा माजी क्रिकेटपटू इयान बेलने यावेळी सांगितले की, " रिषभ पंतविना मी भारताच्या संघाचा विचारही करु शकत नाही. माझ्यामते पंत हा भारतीय संघाचे भविष्य आहे. त्याचबरोबर एक जगविख्यात खेळाडू होण्याकडे त्याची वाटचाल सुरु झाली आहे. पंतकडे जी गुणवत्ता आहे ती बऱ्याच जणांमध्ये पाहायला मिळत नाही. पंतकडे असलेली गुणवत्ता फार कमी लोकांमध्ये असते. त्यामुळे पंत हा एक अविश्वसनीय कामगिरी करणारा खेळाडू आहे, त्याचबरोबर तो एक मॅचविनरही आहे." पंतने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात ९७ धावांची खेळी साकारली होती. त्यानंतर पंतने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चौथ्या कसोटी सामन्यात नाबाद ८९ धावांची खेळी साकारत भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले होते. इंग्लंडविरुद्धच्या कसोटी सामन्यात पंतने शतकही झळकावले होते. इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या वनडे सामन्यांमध्येही पंतने दमदार अर्धशतकी खेळी साकारली होती. चौथ्या वनडेमध्ये तर पंतची खेळी ही भारताकडून सर्वोत्तम अशीच ठरली होती. बेल पुढे म्हणाला की, " पंतसाठी इंग्लंडविरुद्धची मालिका खरंच चांगली गेली. कारण तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये पंतने इंग्लंडविरुद्ध चांगली कामगिरी केली आहे. पंत हा फक्त आक्रमक फटकेबाजी करतो आणि आपली विकेट गमावतो, असे त्याच्याबाबत म्हटले गेले आहे. त्याचबरोबर पंत हा जास्त जोखीम घेऊन फटकेबाजी करतो, असेही म्हटले गेले आहे. पण पंतमध्ये एक शांतचित्त फलंदाजही दडलेला आहे. इंग्लंडच्या या दौऱ्यात ही गोष्ट मला जाणवली. त्यामुळे पंत हा निश्चितच भारताचे भविष्य असून तो एक जगविख्यात खेळाडूही बनू शकतो."
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2PBhtCy
No comments:
Post a Comment