मुंबई : विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली आरसीबीच्या संघाला आतापर्यंत एकही जेतेपद पटकावता आलेले नाही. त्यामुळे कोहलीबाबत यावर्षी एक मोठा बदल करण्यात येणार आहे. आरसीबीच्या संघाने यावेळी याबाबतचा मोठा खुलासा केला आहे. आरसीबीला जर आयीपीएलचे जेतेपद पटकावायचे असेल तर त्यासाठी संघात काही बदल करण गरजेचे आहे. त्यामुळे विराट कोहलीच्या फलंदाजीच्या स्थानामध्ये आता बदल करण्यात येणार आहे. विराट कोहली यावेळी आरसीबीसाठी सलामीवीराची जबाबदारी पार पाडणार आहे. कोहली यावेळी युवा फलंदाज देवदत्त पडीक्कलबरोबर सलामीला येणार असल्याचे आरसीबीच्या संघाचे डायरेक्टर माइक हेसन यांनी स्पष्ट केले आहे. इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या ट्वेन्टी-२० सामन्यांमध्ये कोहली रोहित शर्माबरोबर सलामीला आला होता. त्यावेळी कोहलीने धडाकेबाज फलदाजी केली होती. त्यामुळे आरसीबीनेही यावेळी त्याला सलामीला पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी कोहली २०१६ साली सलामीवीर म्हणून आरसीबीसाठी खेळला होता. यावेळी सलामीला येताना कोहलीने धावांची उधळण केली होती. कोहलीने या मोसमात तब्बल ९७३ धावा केल्या होत्या, यामध्ये सात अर्धशतकांचा समावेश होता. त्याचबरोबर या वर्षी आरसीबीचा संघ आयपीएलच्या अंतिम फेरीतही पोहोचला होता. पण अंतिम फेरीत आरसीबीला सनरायझर्स हैदराबादकडून पराभव पत्करावा लागला होता. याबाबत माइक हेसन म्हणाले की, " माझ्यासाठी खेळाडूचा फॉर्म सर्वात महत्वाचा आहे. कारण एखादा खेळाडू चांगला फॉर्ममध्ये असला की त्याच्यामध्ये चांगला आत्मविश्वास पाहायला मिळतो. काही जणांनी चांगली कामगिरी केली की त्यांचा आत्मविश्वास वाढत असतो, तर काहींचे तसे नसते. आरसीबीसाठी कोहली हा सर्वात अनुभवी खेळाडू आहे. त्यामुळेच आरसीबीसाठी तो सलामीला येऊन फलंदाजी करेल. कोहलीला सलामीला येऊन कसे खेळायचे, ही गोष्ट चांगलीच माहिती आहे." त्यामुळे आता तब्बल पाच वर्षांनी कोहली पुन्हा एकदा आरसीबीकडून सलामीला येणार असल्याचे दिसत आहे. त्यामुळे सलामीला येऊन विराटची कामगिरी नेमकी कशी होते आणि तो किती धावा करतो, याकडे सर्वांचेच लक्ष लागलेले असेल. त्याचबरोबर आरसीबी यावेळी तरी आयपीएलचे जेतेपद जिंकणार का, याचीही उत्सुकता चाहत्यांना असेल.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3sGh6VV
No comments:
Post a Comment