![](https://maharashtratimes.com/photo/81737983/photo-81737983.jpg)
पुणे, : भारतीय संघाने आज तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात दमदार विजय मिळवला. या विजयासह भारतीय संघाने मालिका २-१ अशी जिंकली आहे. भारताने प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडच्या संघापुढे ३३० धावांचे आव्हान ठेवले होते. पण ठराविक फरकाने इंग्लंडचे फलंदाज बाद होत गेले आणि त्यामुळे भारताला या सामन्यात सहज विजय मिळवता आला. भारताच्या ३३० धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडची सुरुवात झोकात झाली खरी, पण त्यानंतर त्यांना धक्के बसत गेले. भारताने पहिल्याच षटकात जेसन रॉयला बाद केले होते. त्याचबरोबर जॉनी बेअरस्टोलाही तिसऱ्या षटकात भुवनेश्वरनेच बाद केले आणि इंग्लंडची २ बाद २८ अशी अवस्था केली होती. त्यावेळी भारतीय संघाकडे तिसरा बळी मिळवण्याची संधी चालून आली होती. त्यावेळी गोलंदाजीही यापूर्वी दोन विकेट्स मिळवणारा भुवनेश्वर कुमारच करत होता. पण हार्दिकमुळे भारताला ही संधी पटकावता आली नाही. पण त्यानंतर टी. नटराजनने स्टोक्सला ३५ धावांवर बाद केले. स्टोक्स बाद झाल्यावर डेव्हिड मलानने यावेळी ५० धावांची दमदार खेळी साकारली खरी, पण त्याला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. भारताचा युवा वेगवान गोलंदाज शार्दुल ठाकूरने त्यानंतर मलानसह कर्णधार जोस बटलर आणि लायम लिव्हिंगस्टोन यांना बाद केले आणि इंग्लंडचे कंबरडे मोडले. शार्दुलने तीन विकेट्स मिळवल्यावर इंग्लंडचा संघ यावेळी बॅकफूटवर ढकलला गेला. त्यानंतर मोइन अली आणि सॅम करन यांनी काही काळ फलंदाजी केली, पण ते संघाला विजय मिळवून देऊ शकले नाहीत. भारताने प्रथम फलंदाजी करताना चांगली सुरुवात केली. भारताला यावेळी शिखर धवनच्या अर्धशतकाच्या जोरावर १०३ धावांची सलामी मिळाली होती. पण त्यानंतर भारताने ५४ धावांमध्ये चार विकेट्स गमावल्या आणि त्यांची ४ बाद १५७ अशी अवस्था झाली होती. त्यावेळी पंतने फलंदाजीला आल्यावर धमाकेदार फलंदाजी केली आणि त्यामुळेच भारताला चांगल्या धावा करता आल्या. पंतला यावेळी हार्दिकची चांगली साथ मिळाली. कारण हार्दिकने यावेळी ६४ धावांची खेळी साकारली. त्यामुळे भारताला पंत आणि हार्दिक यांच्या फलंदाजीच्या जोरावर मोठी धावसंख्या उभारता येऊ शकली.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2QCNv1g
No comments:
Post a Comment