![](https://maharashtratimes.com/photo/81764673/photo-81764673.jpg)
नवी दिल्ली : आयपीएलमधील दिल्ली कपिटल्सच्या संघाने आता मोठी घोषणा केली असून त्यांनी या हंगामासाठी आपल्या कर्णधाराची निवड केली आहे. कर्णधाराच्या स्पर्धेतून आता अजिंक्य रहाणे आणि पृथ्वी शॉ हे दोघेही बाहेर पडले आहेत. दिल्लीच्या संघाने कर्मधारपदी आता यष्टीरक्षक आणि धडाकेबाज फलंदाज रिषभ पंतची निवड केली आहे. आतापर्यंत पंतने दिल्लीच्या संघाचे कर्णधारपद भुषवले नव्हते. पण आता श्रेयस अय्यर आयपीएलमध्ये खेळणार नसल्यामुळे त्याच्या जागी पंत हा दिल्लीचे कर्णधारपद सांभाळणार आहे. दिल्लीच्या कर्णधारपदासाठी अजिंक्य, पृथ्वी. स्टीव्हन स्मिथ, आर. अश्विन आणि पंत यांच्यांमध्ये स्पर्धा असल्याचे पाहायला मिळाले होते. पण दिल्लीच्या संघाने यावेळी पंतच्या नावावर कर्णधार म्हणून शिक्कामोर्तब केले आहे. पंत हा दिल्लीचा असून त्याचा फायदा संघाला होईल, असे वाटत आहे. त्यामुळेच पंतकडे यावेळी संघाचे कर्णधारपद सोपवण्यात आले आहे. इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत श्रेयस अय्यरला गंभीर दुखापत झाली होती. त्याचा खांदा दुखावला गेला होता. त्यामुळे तो आता आयपीएल खेळू शकणार नाही. श्रेयसच्या नेतृत्वाखाली दिल्लीच्या संघाने गेल्या आयपीएलमध्ये अंतिम फेरीपर्यंत मजल मारली होती. पण त्यांना जेतेपद पटकावता आले नव्हते. अंतिम फेरीत दिल्लीला मुंबई इंडियन्सच्या संघाकडून पराभव पत्करावा लागला होता. त्यामुळे आता पंतच्या नेतृत्वाखाली दिल्लीचा संघ कितपत मजल मारतो, याकडे सर्वांचे लक्ष असेल. दिल्लीच्या संघाचा मुख्य प्रशिक्षक रिकी पॉन्टिंगबरोबर संवाद साधल्यानंतर पंतच्या नावावर कर्णधार म्हणून शिक्कामोर्तब करण्यात आल्याचे समजते आहे. त्यामुळे पंत आणि पॉन्टिंग यंदाच्या आयपीएलमध्ये संघाची बांधणी कशी करतात आणि काय रणनिती आखतात, याकडे सर्वांचे लक्ष असेल. त्याचबरोबर पहिल्यांदाच संघाचे नेतृत्व करत असताना पंतची फलंदाजी कशी होते, याकडेही सर्वांचे लक्ष असेल. कारण कर्णधारपदाचा खेळाडूच्या कामगिरीवरही परीणाम होतो, असे पाहिले गेले आहे. त्यामुळे पंतच्या कामगिरीवरही सर्वांची नजर असेल.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3cz33f2
No comments:
Post a Comment