अहमदाबाद, : भारताला तिसऱ्या ट्वेन्टी-२० सामन्यात पराभव पत्करावा लागला. त्यामुळे आता इंग्लंडने मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली आहे. पण भारताला या सामन्यात झालेल्या चार चुका चांगल्या भोवल्याचे पाहायला मिळाले. लोकेश राहुलवर ठेवलेला विश्वास यावेळी भारतीय संघाला चांगलाच महाग पडला. कारण या सामन्यात राहुलला भोपळाही फोडता आला नाही. गेल्या सामन्यातही राहुल शून्यावरच आऊट झाला होता. त्यामुळे आतापर्यंतच्या तीन ट्वेन्टी-२० सामन्यांत राहुलला फक्त एकच धाव करता आली आहे. त्यामुळे राहुलला संघात ठेवून भारतीय संघाने मोठी चुक केल्याचे पाहायला मिळाले. भारतीय संघाला यावेळी चांगली सुरुवात मिळाली नाही. कारण राहुल शून्यावर बाद झाला. त्यानंतर गेल्या सामन्यात अर्धशतक झळकावणाऱ्या इशान किशनला यावेळी फक्त चार धावावर समाधान मानावे लागले. या सामन्यात पुनरागमन करणाऱ्या रोहित शर्मालाही यावेळी १५ धावांवरच समाधान मानावे लागले. त्यामुळे भारताची ३ बाद २४ अशी अवस्था झाली होती. भारताला तीन धक्के बसल्यानंतर रिषभ पंत आणि कर्णधार विराट कोहली यांच्यांमध्ये चांगली भागीदारी होत होती. पण यावेळी विराट कोहलीचया एका चुकीमुळे रिषभ पंतला धावचीत व्हावे लागले. एका चेंडूंवर जोरदार फटका लगावून पंतने दोन धावा घेतल्या होत्या. त्यानंतर यष्टीरक्षकाने चेंडू स्टम्पवर मारण्याचा प्रयत्न केला, पण तो लागला नाही. त्यावेळी कोहलीने पंतला तिसरी धाव घेण्यासाठी सांगितले. कोहली यावेळी सहजपणे क्रीझमध्ये पोहोचला, पण पंतला यावेळी धावचीत होऊन तंबूत परतावे लागले. पंतला यावेळी २५ धावांवर समाधान मानावे लागले. ही जोडी जर जास्त टिकली असती तर भारतीय संघाला मोठी धावसंख्या उभारता आली असती. कोहलीने यावेळी गोलंदाजांचा वापर करताना बऱ्याच चुका केल्याचे पाहायला मिळाले. गेल्या काही सामन्यांमध्ये युजवेंद्र चहलला चांगलाच मार पडत असल्याचे पाहायला मिळत होते, तर वॉशिंग्टन सुंदर चांगली गोलंदाजी करत होता. पण यावेळी पॉवर प्लेमध्ये कोहलीने सुंदरला एकही षटक दिले नाही. पण दुसरीकडे त्याने चहलला गोलंदाजी दिली आणि चहलच्या गोलंदाजीवर इंग्लंडने चांगल्याच धावा लुटल्या.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3vuP01F
No comments:
Post a Comment