अहमदाबाद, : जोस बटलरच्या धडाकेबाज फलंदाजीच्या जोरावर इंग्लंडने भारताला तिसऱ्या ट्वेन्टी-२० सामन्यात सहज पराभूत केले. या विजयासह इंग्लंडने या मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली आहे. त्यामुळे भारताला आता ही मालिका जिंकायची असेल तर त्यांना उर्वरीत दोन्ही सामने जिंकावे लागतील. विराट कोहलीच्या नाबाद अर्धशतकाच्या जोरावर भारताने इंग्लंडपुढे १५७ धावांचे आव्हान ठेवले होते. पण इंग्लंडने भारताचे हे आव्हान सहज पूर्ण केले. बटलरने यावेळी दमदार फलंदाजी करताना ५२ चेंडूंत पाच चौकार आणि चार षटकारांच्या जोरावर नाबाद ८३ धावांची खेळी साकारली. भारताच्या १५७ धावांचा पाठलाग करताना इंग्लंडची सुरुवात चांगली झाली नाही. कारण गेल्या दोन सामन्यांमध्ये धमाकेदार फलंदाजी करणारा जेसन रॉय यावेळी फक्त ९ धावांवर बाद झाला. पण त्यानंतर दोस बटलरने इंग्लंडच्या धावसंख्येला चांगला आकार दिला. कारण बटलरने भारताच्या गोलंदाजीवर जोरदार प्रहार करत २६ चेंडूंमध्ये आपले अर्धशतक साजरे केले. अर्धशतक झळकावल्यावरही बटलर चांगली फलंदाजी करत होता. कर्णधार विराट कोहलीने यावेळी भारतीय गोलंदाजांचा सुरुवातीला चांगला वापर केला नाही. आतापर्यंत भारताला यश मिळवून देणाऱ्या वॉशिंग्टन सुंदरला कोहलीने पॉवर प्लेमध्ये एकही षटक दिले नाही. त्याने युजवेंद्र चहलवर विश्वास दाखवला. चहलने यावेळी भारताला एक बळी मिळवून दिला, पण त्याच्या गोलंदाजीवर बटलरने जोरदार प्रहार केल्याचे पाहायला मिळाले. इंग्लंडने या सामन्यात नाणेफेक जिंकली आणि भारतीय संघाला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केले. आतापर्यंत सातत्याने अपयशी ठरलेल्या लोकेश राहुलला या सामन्यात एकही धाव करता आली नाही. गेल्या तीन सामन्यांमध्ये राहुलला फक्त एकच धाव काढता आली आहे. या सामन्यात पुनरागमन करणाऱ्या रोहित शर्माला यावेळी मोठी खेळी साकारण्यात अपयश आले. रोहितला यावेळी दोन चौकारांच्या जोरावर १५ धावा करता आल्या. त्याचबरोबर गेल्या सामन्यात अर्धशतक झळकावणाऱ्या इशान किशनलाही यावेळी जास्त धावा करता आल्या नाहीत. किशनला यावेळी फक्त चार धावांवर समाधान मानावे लागले भारतीय संघाची सहाव्या षटकात ३ बाद २३ अशी अवस्था झाली होती. पण विराट कोहलीने यावेळी आठ चौकार आणि चार षटकारांच्या जोरावर ४६ चेंडूंत नाबाद ७७ धावांची खेळी साकारली. त्यामुळे भारताला यावेळी इंग्लंडपुढे १५७ धावांचे आव्हान ठेवता आले.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3bPWkNo
No comments:
Post a Comment