नवी दिल्ली : पृथ्वी सावला ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यात चांगली कामगिरी करता आली नाही. त्यामुळेच त्याला भारतीय संघातून वगळण्यात आले होते. पण त्यानंतर झालेल्या विजय हजारे करंडकामध्ये पृथ्वीने धावांचा पाऊस पाडत इतिहास रचला. पृथ्वीमध्ये नेमका हा बदल झाला तरी कसा, हे सर्वांनाच जाणून घ्यायचे आहे. पण पृथ्वीसाठी एक गोष्ट टर्निंग पॉइंट ठरली आणि त्याचा खेळ सुधारल्याचे पाहायला मिळाले. याबाबत पृथ्वी साव म्हणाला की, " मी खूप लहान असल्यापासून नेतृत्व करतो आहे. १४ वर्षांखालील, १६ वर्षांखालील आणि १९ वर्षांखालील संघांचे मी यशस्वी नेतृत्व केले आहे. याशिवाय भारतीय ‘अ’ संघाचे कर्णधारपदही भूषविले. मी नेतृत्वाची मजा घेतो, प्रत्येक चेंडूवर माझे लक्ष असते, यामुळेच कर्णधारपद मला आवडते. याचा सकारात्मक परिणाम माझ्या फलंदाजीवर होतो. मी अधिक एकाग्रतेने फलंदाजी करतो. भारतीय संघातील स्थान गमावल्यानंतर माझ्या चुका सुधारून दमदार पुनरागमन करण्याशिवाय पर्याय नव्हता. हा पर्याय कठीण होता, पण तो एकमेव मार्ग होता. मला परिश्रम घेणे भागच होते. ऑस्ट्रेलियात झालेल्या छोट्या, छोट्या चुका अंगलट आल्या. मला तंत्रावर मेहनत घेणे आवश्यक होते." ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर फलंदाज म्हणून अपयशी ठरल्याने पृथ्वी सावला भारतीय संघातून वगळण्यात आले. धावा होत नसल्याने आत्मविश्वास कमी झाला होताच, त्यात संघातून वगळल्याने तो खचलाही होता. मात्र चुका सुधारून दमदार पुनरागमन करण्याशिवाय पर्याय आपल्यापुढे नाही, हे पृथ्वीने जाणले. त्या दृष्टिने तो कामाला लागला. ज्याचे फलित त्याला विजय हजारे वनडे स्पर्धेतून लाभले. कर्णधारपदामुळे खेळाडूंवर दडपण येते; पण पृथ्वीसाठी हे समीकरण थोडे वेगळे आहे. त्याच्याच म्हणण्यानुसार नेतृत्व करताना त्याची फलंदाजी बहरण्यास मदत मिळाली. मुंबईसाठी ३१३ धावांचे आव्हान यशस्वी पार करण्यात आपल्या नाबाद शतकाने महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या आदित्य तरेचे पृथ्वी सावने कौतुक केले. तो म्हणाला, "आदित्य तरेने खूप छान फलंदाजी केली. लढतीतील स्थिती बघता आवश्यक होती तशीच फलंदाजी आदित्य तरेने केली. जे खूप महत्त्वाचे होते. तो नसता तर लढतीचा निकाल वेगळा लागू शकला असता. आदित्य तरेच्या शतकामुळे आम्ही सगळे खूप खूष आहोत; कारण शतक करत लढतीचा यशस्वी समारोप करणे सोपे नसते. आदित्य तरेने ही भूमिका काम चोख बजावली आहे."
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3eC20MU
No comments:
Post a Comment