दुबई : मुंबई इंडियन्सचे फलंदाज एकामागून एक बाद होत असताना किरॉन पोलार्डने धमाकेदार फलंदाजी करत यावेळी संघाला तारले. पोलार्डने यावेळी २५ चेंडूंत दोन चौकार आणि चार षटकारांच्या जोरावर ४१ धावांची तुफानी खेळी साकारली. पोलार्डच्या या वादळी खेळीच्या जोरावर मुंबईला सनरायझर्स हैदराबादच्या संघापुढे १५० धावांचे आव्हान ठेवता आले. आजच्या सामन्यात रोहित शर्मा हा दुखापतीनंतर पुनरागमन करत होता. त्याचबरोबर सनरायझर्स हैदरााबदने नाणेफेक जिंकत गोलंदाजी स्वीकारली आणि रोहित लवकरच फलंदाजीसाठी आलेला पाहायला मिळाला. रोहित या पुनरागमनाच्या सामन्यात किती धावा करणार, याची उत्सुकता सर्वांनाच होती. रोहितने संयतपणे सुरुवात केली. पण एक मोठा फटका मारण्याच्या नादात रोहित बाद झाला. रोहितला यावेळी चार धावांवरच समाधान मानावे लागले. रोहित बाद झाल्यावर क्विंटन डीकॉक आणि सूर्यकुमार यादव यांची चांगलीच जोडी जमलेली पाहायला मिळाली. डीकॉकने यावेळी पाचव्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर चौकार लगावला, त्यानंतर दोन षटकार लगावले. पण चौथ्या चेंडूवर मोठा फटका मारण्याच्या नादात डीकॉक बाद झाला. डीकॉक बाद झाल्यावर सूर्यकुमार यादव आणि इशान किशन यांच्यामध्ये चांगली भागीदारी पाहायला मिळाली. पण सूर्यकुमार बाद झाल्यावर एका धावेत मुंबईने तीन बळी गमावल्याचे पाहायला मिळाले. बाराव्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर हैदराबादचा फिरकीपटू शाहबाज नदीमने सूर्यकुमारला बाद करत मुंबईला मोठा धक्का दिला. स्थिरस्थावर झालेल्या सूर्यकुमारने पाच चौकारांच्या जोरावर ३६ धावा केल्या. या षटकाच्या चौथ्या चेंडूवर नदीमने कृणाल पंड्याला बाद केले. कृणालला यावेळी भोपळाही फोडता आला नाही. त्यानंतर १३व्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर फिरकीपटू रशिद खानने मुंबईच्या सौरभ तिवारीला बाद केले. तिवारीला यावेळी फक्त एक धाव करता आली. मुंबईचा अर्धा संघ ८२ धावांमध्ये तंबूत परतला होता. त्यावेळी इशान किशन आणि किरॉन पोलार्ड यांनी दमदार फलंदाजी करत काही काळ चांगली फलंदाजी केली. पण संदीप शर्माने यावेळी इशानला बाद करत मुंबईला सहावा धक्का दिला. इशानने यावेळी १ चौकार आणि दोन षटकारांच्या जोरावर ३३ धावा केल्या.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2TMCDMG
No comments:
Post a Comment