मुंबई, : विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भाराताने ऑस्ट्रेलियातील एकद्वसीय मालिका गमावली आहे. पण या पराभवानंतर कोहलीच्या नावावर एक नकोसा विक्रम जमा झाला आहे. कोहलीच्या नेतृत्वाखाली भारताची एवढी वाईट परिस्थिती कधीच नव्हती. त्याचबरोबर गेल्या १५ वर्षांमधील भारताची ही लाजीरवाणी कामगिरी आहे. यापूर्वी भारतीय संघ न्यूझीलंडच्या दौऱ्यावर गेला होता. त्यावेळी भारताला तीन एकदिवसीय सामन्यांमध्ये पराभव पत्करावा लागला होता. त्यानंतर ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या दोन एकदिवसीय सामन्यांत भारताला दोन सामने गमवावे लागले आहेत. त्यामुळे कोहलीच्या नावावर आता सलग पाच पराभव जमा झालेले आहेत. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यमध्ये भारतात एकदिवसीय मालिका होणार होती. पण या मालिकेतील पहिलाच सामना रद्द झाला होता. त्याचबरोबर ही मालिका करोनामुळे रद्द करावी लागली होती. भारताचा कर्णधार कोहली आणि मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री या दोघांच्या नावावरही नेतृत्व करताना सलग पाच सामने गमावण्याची वेळ आली आहे. १९८८ साली रवी शास्त्री भारताचे कर्णधार असतानाही भारतीय संघ सलग पाच सामन्यांमध्ये पराभूत झाला होता. त्यानंतर आता २०२० साली शास्त्री भारताचे प्रशिक्षक असताना पुन्हा एकदा भारतावर ही वेळ आली आहे. यापूर्वी सौरव गांगुली आणि राहुल द्रविड यांनाही सलग पाच सामन्यांमध्ये पराभव पत्करावा लागला होता. २००२ साली गांगुली कर्णधार असताना भारताला सलग पाच सामने गमवावे लागले होते. त्यानंतर २००५ साली जेव्हा राहुल द्रविड भारताचा कर्णधार होता तेव्हाही भारतीय संघ सलग सामने पराभूत झाला होता. त्यानंतर आता थेट १५ वर्षांनी भारताच्या पदरी सलग पाच पराभव पडलेले आहेत. यापूर्वी भारताला काही वेळा सलग पाच सामने पराभूत व्हावे लागले होते. १९७८ साली बिशन सिंग बेदी आणि वेंकटराघवन यांच्याकडे भारताचे नेतृत्व होते, त्यावेळी त्यांना सलग पाच सामने गमवावे लागले होते. त्यानंतर १९८५ साली भारताचे कर्णधार कपिल देव असताना भारताने सलग पाच सामने गमावले होते. आतापर्यंत सलग जास्त पराभव सुनील गावस्कर भारताचे कर्णधार असताना झाले होते. १९८१ साली गावस्कर भारताचे कर्णधार होते, त्यावेळी भारतीय संघाला सलग आठ सामन्यांमध्ये पराभव पत्करावा लागला होता. त्यानंतर १९८९ साली भारताला सलग सात सामन्यांमध्ये पराभव स्वीकारावा लागला होता.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3qatnRr
No comments:
Post a Comment