नवी दिल्ली : रोहित शर्मा आता ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर जाणार हे जवळपास निश्चित झाले आहे. कारण बीसीसीआयने रोहितच्या ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यासाठी ट्रॅव्हल प्लॅन आखला आहे, असे वृत्त मुंबई मिररने दिले आहे. त्यामुळे आता रोहित चाहत्यांना आनंदाची बातमी मिळाली असून रोहित नेमका ऑस्ट्रेलियामध्ये कधी जाणार, याची उत्सुकता आता त्याच्या चाहत्यांना असेल. रोहित शर्माच्या दुखापतीबाबत आपल्याला काहीच माहिती नव्हती. मला वाटले रोहित हा आमच्याबरोबर ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर येणार आहे. पण बीसीसीआयने याबाबतची माहिती आम्हाला दिली नव्हती, असे भारताचा कर्णधार विराट कोहलीने गुरुवारी सांगितले होते. त्यानंतर बीसीसीआयमध्ये मोठ्या हालचाली झाल्या. बीसीसीआयने एक पत्रक काढत रोहित आयपीएलनंतर भारतामध्ये का आला, याबाबतचे स्पष्टीकरण दिले आहे. त्याचबरोबर रोहितच्या ट्रॅव्हल प्लॅन बीसीसीआयने आखला आहे, अशी माहितीही समोर येत आहे. बीसीसीआयने गुरुवारी रात्री उशिरा एक पत्रक काढले. या पत्रकामध्ये बीसीसीआयने म्हटले आहे की, " सध्याच्या घडीला रोहित हा राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये आपल्या दुखापतीनंतर पुर्नवसनाचे काम काम करत आहे. रोहितची फिटनेस चाचणी ११ डिसेंबरला होणार आहे. या चाचणीमध्ये रोहित पास झाल्यावर त्याच्याबाबतचा निर्णय बीसीसीआयला घेता येणार आहे. रोहितच्या वडिलांची तब्येत बिघडली होती, त्यामुळेच तो युएईवरून थेट मुंबईमध्ये दाखल झाला होता. रोहितच्या वडिलांची तब्येत आता सुधारत आहे. त्यामुळे तो राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये दाखल झाला आहे." रोहितच्या दुखापतीबाबत कोहली म्हणाला होता की, " आयपीएल सुरु असतानाच ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यासाठी भारतीय संघाची निवड होणार होती. त्यासाठीच प्रशिक्षक आणि निवड समिती यांच्याशी संवाद साधण्यात आला होता. पण भारतीय संघाची निवड करण्याच्या दोन दिवसांपूर्वी आम्हाला एक इमेल आला. या इमेलमध्ये सांगण्यात आले होते की, रोहित शर्माला आयपीएल खेळताना दुखापत झाली आहे. त्याचबरोबर या दुखापतीची सर्व माहिती रोहितला देण्यात आलेली आहे. त्याला आपल्या दुखापतीबद्दल आता सर्व माहिती आहे. त्यामुळेच तो ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यासाठी होणाऱ्या निवडीसाठी उपलब्ध होऊ शकणार नाही." कोहलीने पुढे सांगितले की, " निवड समितीने ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यासाठी भारतीय संघाची निवड केली आणि त्यानंतर रोहित शर्मा आयपीएल खेळताना पाहायला मिळाला. त्यामुळे मला वाटले की तो आम्हा सर्वांबरोबर ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर येणार आहे. मला वाटले रोहित माझ्याबरोबरच ऑस्ट्रेलियाच्या विमानात असेल, पण तसे झाले नाही. रोहित आमच्याबरोबर ऑस्ट्रेलियाला प्रवास करणार की नाही, याबाबत आम्हाला कोणतीही कल्पना देण्यात आली नव्हती. आम्ही रोहितची वाट पाहत होतो, पण रोहित काही आला नाही."
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3fH2dNu
No comments:
Post a Comment