सिडनी, : परिस्थिती कशीही असली तरी ती बदलण्याची धमक तुमच्या मनगटामध्ये असते, असे म्हटले जाते. ही गोष्ट आता सत्यात उतरलेली पाहायला मिळत आहे. कारण गरिब कुटुंबात जन्माला आलेला एक मुलगा, ज्याची आई मजूरी करायची, त्याला आता ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यासाठी भारतीय संघात स्थान मिळालेले पाहायला मिळत आहे. या युवा खेळाडू ही संघर्ष गाथा नक्कीच वाचण्यासारखी आहे. यावर्षी झालेल्या आयपीएलमध्ये यॉर्कर किंग म्हणून त्याची ओळख झाली. आपल्या भेदक यॉर्कच्या जोरावर त्याने भल्या भल्या फलंदाजांना आपल्या तालावर नाचवले. या नेत्रदीपक कामगिरीच्या जोरावरच त्याची ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर जाणाऱ्या भारतीय संघात निवड झाली. हा भारताचा युवा वेगवान गोलंदाज आहे टी. नटराजन. गरिब कुटुंबामध्ये नटराजनचा जन्म झाला. त्याच्या आईने मजूरी करुन नटराजनचे पोट भरले. तामिळनाडूतील चिन्नापाम्पट्टी गावात त्याचा जन्म झाला. पण गाठिशी पैसे नसल्यामुळे नटराजन हा गल्लीमध्येच क्रिकेट खेळायचा. नटराजनची गोलंदाजी एवढी भेदक होती की त्याचा सामाना कराया गल्लीतील प्रत्येक फलंदाज घाबरायचा. त्याची ही गोलंदाजी प्रशिक्षक जयप्रकाश यांनी पाहिली आणि त्याला थेट तामिळनाडू प्रीमिअर लीगमध्ये खेळण्याची संधी दिली. त्यानंतर नटराजनने मागे वळून पाहिलेच नाही. नटराजनला त्यानंतर तामिळनाडूच्या संघात स्थान मिळाले. यावेळी नटराजनने ९ सामन्यांत २७ विकेट्स मिळवले आणि तो प्रकाशझोतात आला. नटराजनला २०१७ साली किंग्स इलेव्हन पंजाबच्या संघाने तीन कोटी रुपये मोजून आपल्या संघात स्थान दिले होते. पण त्यानंतरच्या हंगामासाठी पंजाबच्या संघाने त्याला कायम ठेवले नाही. त्यामुळे लिलावात त्याला सनरायझर्स हैदराबादच्या संघाने आपल्या ताफ्यात सामील करून घेतले. यावर्षी नटराजनला चांगली संधी मिळाली आणि त्याने या संधीचे सोने केले. आयपीएलमधील दमदार कामगिरीच्या जोरावर नटराजनला भारतीय संघातही स्थान देण्यात आले. बुधवारी नटराजनने भारतीय संघाच्या नवीन जर्सीबरोबर एक फोटो काढला आणि तो सोशल मीडियावर पोस्ट केला होता. भारतीय संघाची जर्सी परीधान करण्याचा अनुभव काही औरच आहे, असे नटराजनने यावेळी म्हटले होते. आता नटराजनला किती सामन्यांमध्ये संधी मिळते, याची उत्सुकता सर्व चाहत्यांना असेल.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/377NUxv
No comments:
Post a Comment