सिडनी : भारतीय संघाचे सर्वाधिक गुण असूनही आम्ही दुसऱ्या स्थानावर का, असा सवाल भारताचा कर्णधार विराट कोहलीने आयीसीसीला केला आहे. आयीसीसीचा नवा नियम संभ्रमात टाकणारा आहे. त्यामुळे आयीसीसीने हा नवीन बदल का केला आहे, याची कारणं कोहलीने आयसीसीकडे मागितली आहेत. भारतीय संघाचे सर्वाधिक जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत गुण आहेत. पण आयसीसीच्या नव्या नियमानुसार सर्वाधिक गुण असूनही भारतीय संघ दुसऱ्या स्थानावर आहे. आयसीसीच्या या नियमाचा फायदा ऑस्ट्रेलियाच्या संघाला झालेला असून त्यांनी भारताला मागे सारून अव्वल स्थान पटकावले आहे. कोहली म्हणाला की, " जेव्हा जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा सुरु करण्यात आली होती, त्यावेळी सर्वाधिक गुण ज्या संघाचे असतील तो अव्वल असेल, असे सांगण्यात आले होते. पण आता स्पर्धा अर्ध्यावर असताना आयसीसीने बदललेला नियम संभ्रमात टाकणारा आहे. आयसीसीचा हा नवीन नियम कळायला सोपा नक्कीच नाही. त्यामुळे आयसीसीने हा नियम का बनवला, याबाबत त्यांना प्रश्न विचारायला हवा." भारताने आतापर्यंत तीन कसोटी मालिका खेळल्या आहेत. या तीन कसोटी मालिकांमध्ये भारताने ९ सामने खेळले आहेत. या ९ सामन्यांमध्ये भारताने सात लढतींमध्ये विजय मिळवला आहे. त्याचबरोबर दोन सामन्यांमध्ये त्यांना पराभव पत्करावा लागला आहे. सध्याच्या घडीला जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत भारतीय संघाचे सर्वाधिक ३६० गुण आहेत. पण सर्वाधिक गुण असूनही आयसीसीच्या नव्या नियमानुसार भारतीय संघ अव्वल स्थानावर पाहायला मिळत नाही. कोहली पुढे म्हणाला की, " आयसीसीने पहिल्यांदा जो नियम बनवला होता तो समजायला सोपा होता. कारण एखादा सामना जिंकल्यावर जे गुण मिळतात त्यानुसार कोणता संघ अव्वल ठरणार हे सहज समजू शकत होते. पण आता या नवीन नियमांमुळे कोणता संघ अव्वल असेल हे समजणे तेवढे सोपे नसणार आहे. त्याचबरोबर हा बदल नेमका का करण्यात आला, हेदेखील समजू शकलेले नाही." ऑस्ट्रेलियाच्या संघाने आतापर्यंत चार कसोटी मालिका खेळल्या आहेत. या चार कसोटी मालिकांमध्ये ऑस्ट्रेलियाने १० सामने खेळले आहेत. या १० लढतींमध्ये ऑस्ट्रेलियाने सात सामन्यांमध्ये विजय मिळवले आहेत. त्याचबरोबर दोन लढतींमध्ये त्यांना पराभव पत्करावे लागले आहेत, तर एक सामना अनिर्णित राहीलेला आहे. सध्याच्या घडीला ऑस्ट्रेलियाचे २९६ गुण आहेत. पण भारतापेक्षा कमी गुण असूनही ऑस्ट्रेलियाचा संघ अव्वल स्थानावर विराजमान झाला आहे.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/37apFPh
No comments:
Post a Comment