सिडनी, : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसरा वनडे सामना रविवारी (उद्या, २९ नोव्हेंबर) होणार आहे. पहिल्या वनडे सामन्यात भारताला पराभव पत्करावा लागला होता. पण पहिल्या सामन्यातील पराभवातून भारतीय संघ काही शिकणार का आणि संघात नेमका काय बदल होणार आहे, जाणून घ्या संभाव्य संघ... पहिल्या सामन्यात भारताच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई करण्यात आली होती. त्यामुळे भारताच्या गोलंदाजीमध्ये बदल करायला हवा, असे बऱ्याच चाहत्यांना वाटत आहे. खासकरून फिरकीपटू युजवेंद्र चहलच्या गोलंदाजीवर जास्त धावा दिल्या होत्या. त्यामुळे चहलच्याजागी संघात कुलदीप यादवला स्थान मिळणार का, याची उत्सुकता सर्वांना असेल. त्याचबरोबर भारतीय संघात अष्टपैलू खेळाडू दिसत नाही. हार्दिक पंड्या सध्या गोलंदाजी करत नसल्याने तो फलंदाज म्हणून संघात आहे. त्यामुळे भारताला सध्याच्या घडीला एका चांगल्या अष्टपैलू खेळाडूची नितांत गरज आहे. पण ही तीन सामन्यांचीच मालिका आहे. त्यामुळे भारतीय संघात मोठे बदल केले जातील, याची शक्यता फारच कमी आहे. ऑस्ट्रेलियाच्या संघातही जास्त बदल केले जातील, असे दिसत नाही. कारण ऑस्ट्रेलियाने गेल्या सामन्यात फलंदाजी आणि गोलंदाजीमध्ये चांगली कामगिरी केली होती. पण पहिल्या एकदिवसीय सामन्यात त्यांचा अष्टपैलू खेळाडू मार्कस स्टॉइनिस दुखापतग्रस्त झाला होता. त्यामुळे तो जर फिट नसेल तर ऑस्ट्रेलियाच्या संघात कॅमेरुन ग्रीनला संधी देण्यात येऊ शकते, असे म्हटले जात आहे. पण ऑस्ट्रेलियाचा बाकीचा संघ तसाच कायम राहील, असे म्हटले जात आहे. त्यामुळे दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात नेमका कोणता संघ बाजी मारतो, याची उत्सुकता चाहत्यांना नक्कीच असेल. असा असेल संभाव्य संघ भारत- शिखर धवन, मयांक अग्रवाल, विराट कोहली (कर्णधार), श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकिपर), हार्दिक पांड्या, रविंद्र जडेजा, नवदीप सैनी, मोहम्मद शमी, युजवेंद्र चहल, जसप्रीत बुमराह. ऑस्ट्रेलिया- अरोन फिंच (कर्णधार), डेव्हिड वॉर्नर, स्टीव्ह स्मिथ, मार्नस लाबुशाने, मार्कस स्टायोनिस, अलेक्स कॅरी (विकेटकिपर), ग्लेन मॅक्सवेल, पॅट कमिन्स, मिशेल स्टार्क, जोश हेजलवुड, एडम जाम्पा.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2JjrocO
No comments:
Post a Comment