कोलंबो : आपल्या वेगवान गोलंदाजीने श्रीलंकेच्या लसिथ मलिंगाने क्रिकेट विश्वावर आपली मोहिती टाकली होती. मलिंगा आता करोडपटी नक्कीच झाला आहे. पण दुर्देवाची गोष्ट म्हणजे एवढे पैसे कमावूनही मलिंगाचे त्याच्या आई-वडिलांकडे दुर्लक्ष झालेले पाहायला मिळत आहे. मलिंगाच्या आईला आजही शिवणकाम करून आपले घर चालवण्याची पाळी आली आहे. त्यामुळेच मलिंगाला चाहत्यांचा रोष ओढवून घ्यावा लागत आहे. गेल्या दहा वर्षांपासून मलिंगा आपल्या आई-वडिलांना भेटलेला नाही आणि त्यांची विचारपूसही केलेली नाही. याबाबत मलिंगाची आई स्वर्णा यांनी सांगितले की, " आमचा मुलगा फारच व्यस्त झाला आहे, असे आम्हाला वाटते. त्याला गॉलपेक्षा कोलंबोमधील आयुष्य जास्त आवडत असावे, त्यामुळे तो आम्हाला भेटायलाही येऊ शकलेला नाही. या गोष्टीला साधरणपणे १० वर्षे झाली असतील. पण जिथे तो खूष असेल तोच आमचा आनंद आहे." याबाबतचे एक वृत्त इंडियन एक्सप्रेसने प्रकाशित केले आहे. यानुसार लसिथ मलिंगाचे आई-वडिल गॉल येथील रथगामा या भागात राहतात. पण अजूनही मलिंगाच्या आईला शिवणकाम करून आपले पोट भरावे लागत आहे. मलिंगाची आई पॉलिस्टरचे कपडे शिवते आणि यामधूनच आपली दिनचर्या चालवते. मलिंगाच्या आई-वडिलांचा आर्थिक स्थिती फारच बिकट आहे आणि त्यांना अजूनही कष्ट करून आपले जीनव चालवावे लागत आहे. मलिंगाने २००४ साली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. आपल्या गोलंदाजी शैलीमुळे मलिंगा बऱ्याचदा प्रकाशझोतात आला होता. त्याचबरोबर मलिंगाने आपला एक दबदबा बनवला होता. श्रीलंकेकडून तर मलिंगा खेळलाच पण आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सच्या संघाचे प्रतिनिधीत्वही त्याने केले. त्यामुळे आतापर्यंत मलिंगा नक्कीच करोडपती झाला असेल. पण गाठिशी एवढे पैसे असूनही मलिंगा आपल्या जन्मदात्या आई-वडिलांनाच विसरल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळेच मलिंगाला काही व्यक्तींनी ट्रोलही केले आहे. त्यामुळे आता यापुढे तरी मलिंगा आपल्या आई-वडिलांना भेटणार का आणि त्यांचे कष्टदायी आयुष्य सुखद करणार का, याची उत्सुकता चाहत्यांना असेल.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2V35Bsa
No comments:
Post a Comment