आबुधाबी : अजिंक्य रहाणे आणि शिखर धवन यांच्या अर्धशतकांच्या जोरावर दिल्ली कॅपिटल्सने आरसीबीच्या संघावर दमदार विजय मिळवला. या विजयासह दिल्लीने आपले प्ले-ऑफमधील स्थान पक्के केले आहे. आरसीबीने या सामन्यात दिल्लीपुढे १५३ धावांचे आव्हान ठेवले होते. दिल्लीने अजिंक्य आणि धवन यांच्या अर्धशतकाच्या जोरावर हे आव्हान लीलया पार करत सहा विकेट्स राखून विजय मिळवला. आरसीबीच्या १५३ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना दिल्लीची सुरुवात चांगली झाली नाही. कारण दिल्लीला सलामीवीर पृथ्वी शॉच्या रुपात पहिला धक्का बसला. आरसीबीचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने पृथ्वीला त्रिफळाचीत करत मुंबईला पहिला धक्का दिला. पृथ्वीला यावेळी ९ धावांवर समाधान मानावे लागले. पृथ्वी बाद झाल्यावर फलंदाजीला आला तो अजिंक्य रहाणे. आतापर्यंतच्या आयपीएलमध्ये अजिंक्यला चांगल्या धावा करता आल्या नव्हत्या, पण तरीही आजच्या सामन्यात अजिंक्यला संधी देण्यात आली होती. अजिंक्य यावेळी फलंदाजी करताना सकारात्मक दिसला. त्यामुळेच अजिंक्य आणि सलामीवीर शिखर धवन यांची यावेळी चांगली भागीदारी पाहायला मिळाली. या दोघांनी एकेरी-दुहेरी धावसंख्येवर भर दिलाच, पण वाईट चेंडूवर मोठे फटके मारालाही हे दोघे विसरले नाहीत. अजिंक्य आणि धवन यांनी यावेळी दमदार फलंदाजी करत दुसऱ्या विकेटसाठी ८८ धावांची महत्वपूर्ण भागीदारी रचली. शिखर धवनने यावेळी चौकारासह आपले अर्धशतकही साजरे केले. पण अर्धशतक झळकावल्यावर धवन जास्त काळ फलंदाजी करू शकला नाही. धवनला यावेळी आरसीबीचा युवा फिरकीपटू शाहबाज अहमदने बाद केले. धवनने यावेळी ४१ चेंडूंत सहा चौकारांच्या जोरावर ५४ धावांची खेळी साकारली. धवन बाद झाल्यावर फलंदाजीला आला दिल्लीचा कर्णधार श्रेयस अय्यर. पण अय्यरला यावेळी मोठी खेळी साकारता आली नाही अजिंक्यने यावेळी अर्धशतक झळकावले खरे, पण संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब त्याला करता आले नाही. अजिंक्यने यावेळी ४६ चेंडूंत पाच चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर ६० धावांची खेळी साकारली. निर्णायक सामन्यात आरसीबीचा कर्णधार विराट कोहली आणि धडाकेबाज फलंदाज एबी डिव्हिलियर्स मोठी खेळी साकारण्यात अपयशी ठरले. पण तरीही देवदत्त पडीक्कलने यावेळी अर्धशतक झळकावले. देवदत्तच्या अर्धशतकाच्या जोरावर यावेळी आरसीबीला दिल्लीपुढे १५३ धावांचे आव्हान ठेवता आले. दिल्लीकडून यावेळी एनरीच नॉर्टजे याने सर्वाधिक तीन बळी मिळवले, तर कागिसो रबाडाने दोन बळी मिळवत त्याला चांगली साथ दिली.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2TNl2UY
No comments:
Post a Comment