आबुधाबी : निर्णायक सामन्यात आरसीबीचा कर्णधार विराट कोहली आणि धडाकेबाज फलंदाज एबी डिव्हिलियर्स मोठी खेळी साकारण्यात अपयशी ठरले. पण तरीही देवदत्त पडीक्कलने यावेळी अर्धशतक झळकावले. देवदत्तच्या अर्धशतकाच्या जोरावर यावेळी आरसीबीला दिल्लीपुढे १५३ धावांचे आव्हान ठेवता आले. दिल्लीकडून यावेळी एनरीच नॉर्टजे याने सर्वाधिक तीन बळी मिळवले, तर कागिसो रबाडाने दोन बळी मिळवत त्याला चांगली साथ दिली. दिल्लीच्या संघाने यावेळी नाणेफेक जिंकली आणि आरसीबीच्या संघाला प्रथम फलंदाजी करण्यासाठी पाचारण केले. या महत्वाच्या सामन्यात कोहली आणि डिव्हिलियर्स यांच्याकडून चाहत्यांना मोठ्या खेळींची अपेक्षा होती. या दोघांनीही बऱ्यापैकी धावा केल्या, पण मोठी खेळी साकारण्यात मात्र ते अपयशी ठरले. पण दुसरीकडे संघातील युवा सलामीवीर देवदत्तने दिल्लीच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेत आपले अर्धशतक पूर्ण केल्याचे पाहायला मिळाले. देवदत्तने यावेळी ४१ चेंडूंत पाच चौकारांच्या जोरावर ५० धावांची खेळी साकारली. देवदत्त आणि कोहली यांची जोडी काही काळ चांगली जमली. देवदत्त आणि कोहलीची जोडी मोठी धावसंख्या उभारणार असे वाटत होते. पण यावेळी दिल्लीचा फिरकीपटू आर. अश्विनने कोहलीचा महत्वाचा बळी आपल्या संघाला मिळवून दिला. कोहलीला यावेळी २४ चेंडूंत २९ धावा करता आल्या. कोहली बाद झाल्यावर देवदत्तने आपेल अर्धशतक साजरे केले. पण अर्धशतक साजरे केल्यावर देवदत्त एकही धाव काढू शकला नाही. दिल्लीचा वेगवान गोलंदाज एनरिच नॉर्टजेने यावेळी पडीक्कलला बाद केले. स्थिरस्थावर झालेला पडीक्कल बाद झाल्यावर संघाची सर्व जबाबदारी डिव्हिलियर्सवर होती. डिव्हिलियर्सने काही मोठे फटके खेचलेही, पण अखेरच्या षटकात डिव्हिलियर्सला मोठी फटकेबाजी करता आली नाही. चोरटी धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये डिव्हिलियर्स यावेळी बाद झाला. डिव्हिलियर्सने एक चौकार आणि दोव षटाकारांच्या जोरावर ३५ धावा केल्या. डिव्हिलियर्सकडून अखेरच्या षटकात मोठ्या अपेक्षा होत्या. कारण डिव्हिलियर्सने अखेरच्या षटकात मोठी फटकेबाजी केली असतील तर आरसीबीचा संघ १७० धावांपर्यंतही पोहोचू शकला असता. पण यामध्ये डिव्हिलियर्सला अपयश आल्याचे पाहायला मिळाले.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/34MOYa3
No comments:
Post a Comment