
अहमदाबाद, : विराट कोहली आणि जो रुट हे जगातील अव्वल फलंदाजांपैकी एक आहेत. पण सध्याच्या घडीला पाहिले तर रुटपुढे कोहली हा सुपर फ्लॉप ठरताना दिसत आहे. रुट हा या वर्षात भन्नाट फॉर्मात आहे. रुटने भारताविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात द्विशतक झळकावले होते. हा त्याचा शंभरावा कसोटी सामना होता. आपल्या या द्विशतकाच्या जोरावर रुटने इंग्लंडला विजय मिळवून दिला होता. त्याचबरोबर तिसऱ्या कसोटी सामन्यात रुटने फक्त आठ धावांमध्ये भारताच्या पाच फलंदाजांना बाद केले होते. पण अजूनपर्यंत कोहलीला रुटसारखी फलंदाजीही करता आलेली नाही. रुटने या वर्षात आतापर्यंत पाच कसोटी सामने खेळले आहेत. या पाच कसोटी सामन्यांमध्ये रुटने ७६च्या सरासरीने ७५९ धावा बनवल्या आहे. यावर्षी सर्वाधिक धावा बनणारा कर्णधार हा आतापर्यंत रुट ठरलेला आहे. कारण आतापर्यंत कोणत्याही कर्णधाराला ३००पेक्षा जास्त धावा करता आलेल्या नाहीत. रुटने या वर्षात तीन शतके झळकावली आहेत, यामध्ये दोन द्विशतकांचा समावेश आहे. इंग्लंडच्या संघाने या वर्षात एकूण २१३३ धावा केल्या आहेत. त्यामुळे रुटने संघाच्या धावसंख्येच्या जवळपास ३६ टक्के धावा एकट्यानेच केलेल्या आहेत. रुटच्या नेतृत्वाखाली इंग्लंडने यावर्षी श्रीलंकेत २-१ असा विजय मिळवला होता. रुटने या वर्षात सर्वाधिक २२८ धावांची खेळी साकारली आहे. कोहलीला या वर्षात फारशी चांगली कामगिरी करता आलेली नाही. कोहली या वर्षात तीन कसोटी सामने खेळला आहे. या तीन कसोटी सामन्यांतील पाच डावांमध्ये कोहलीची सरासरी ही ३६एवढी आहे. आतापर्यंत तीन कसोटी सामन्यांमध्ये कोहलीने १७२ धावा बनवल्या आहेत. ज्यामध्ये दोन अर्धशतकांचा समावेश आहे. कोहलीची यावेळी सर्वोत्तम धावसंख्या ७२ असून त्याला या वर्षात एकही शतक अजूनपर्यंत झळकावता आलेले नाही. भारतीय संघाने या वर्षात एकूण पाच कसोटी सामने खेळले आहेत. या पाच कसोटी सामन्यांमध्ये भारतीय संघाने एकूण २४६४ धावा केल्या आहे. त्यानुसार कोहलीने आपल्या संघाच्या धावसंख्येमध्ये फक्त सात टक्के एवढ्याच धावा केल्या आहेत. कोहलीने या वर्षात ऑस्ट्रेलियातील दोन कसोटी सामने खेळले नव्हते. पण त्यानंतरही कोहलीला आतापर्यंतच्या तीन कसोटी सामन्यांमध्ये लौकिकाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3bQdM33
No comments:
Post a Comment