अहमदाबाद, : इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या ट्वेन्टी-२० सामन्यात रोहित शर्माला खेळवण्यात आले नाही. त्यानंतर भारताचा माजी धडाकेबाज क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवाग चांगलाच भडकला आहे. जर रोहित खेळणार नसेल तर मी टीव्हीच बंद करुन टाकेन, असे वक्तव्य सेहवागने केले आहे. सेहवाग म्हणाला की, " विराट कोहलीने सांगितले की, रोहित शर्मा सुरुवातीच्या काही सामन्यांमध्ये खेळणार नाही. पण जर भारतीय संघाने पहिला आणि दुसरा सामना गमवला तर त्यांची रणनिती अशीच राहणार का? पराभवाचा संघावर मोठा परिणाम पडत असतो. मी कर्णधार असलो असतो तर नक्कीच रोहितला ११ सदस्यांच्या संघात स्थान दिले असते. चाहत्यांनाही रोहित शर्माला पाहायचे आहे. मी पण रोहितचा चाहता आहे. जर रोहित खेळणार नसेल तर मी टीव्हीच बंद करुन टाकेन. कारण मॅच बघायचा माझा मुडच राहणार नाही." सेहवागने पुढे सांगितले की, " भारतीय संघ ट्वेन्टी-२० विश्वचषकाचा विचार करत असेल तर त्यांनी रोहित, राहुल आणि धवन या तिघांनाही संधी द्यायला हवी. राहुल हा एकदिवसीय क्रिकेटमध्ये पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला येतो, त्यामुळे तो ट्वेन्टी-२० क्रिकेटमध्ये चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करु शकतो. पण जर राहुलला सलामीला खेळवायचे असेल तर धवनला तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला पाठवू शकतो आणि त्यानंतर चौथ्या क्रमांकावर विराट फलंदाजीला येऊ शकतो." विराट कोहलीने सामन्यापूर्वी सांगितले होते की, रोहित शर्मा आणि लोकेश राहुल हे दोघे सलामीली येतील. त्याचबरोबर शिखर धवन हा तिसरा सलामीवीर असेल. पण सामन्यामध्ये रोहित शर्माला खेळवण्यात आले नाही आणि त्याच्या जागी शिखर धवनला संधी देण्यात आली. पण शिखर धवनला या संधीचे सोने करता आले नाही. कारण पहिल्या सामन्यात धवन हा फक्त चार धावा करून बाद झाला. रोहित शर्माला दुसऱ्या सामन्यात खेळवायला हवे, अशी मागणी चाहत्यांकडून होत असल्याचेही पाहायला मिळत आहे. पण संघात जर रोहितला संधी द्यायची असेल, तर त्यासाठी काही महत्वाचे बदल करावे लागतील. रोहितला जर दुसऱ्या कसोटी सामन्यात खेळवायचे असेल तर लोकेश राहुल किंवा शिखर धवन या दोघांपैकी एकाला डच्चू द्यावा लागेल.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3eBWD0a
No comments:
Post a Comment