पुणे : भारतामध्ये येत्या काही महिन्यांमध्ये ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धा रंगणार आहे. या विश्वचषकाच्या संघबांधणीसाठी भारतीय संघ जोरदार तयारी करत आहे. कारण भारतीय संघात सध्याच्या घडीला बरेच प्रयोग केले जात आहे. ट्वेन्टी-२० विश्वचषकाच्या संघ निवडीवरुन भारताचा उपकर्णधार आणि धडाकेबाज सलामीवीर रोहित शर्माने आपले मत व्यक्त केले आहे. इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या ट्वेन्टी-२० सामन्यात भारतीय संघात काही प्रयोग केले गेले. विराट कोहलीने इंग्लंडविरुद्धच्या निर्णायक टी-२० लढतीत सलामीला येत नाबाद ८० धावांची दमदार खेळी केली. तो विजयाचा शिल्पकारच ठरला. यामुळे याच वर्षी भारतात होणाऱ्या टी-२० वर्ल्ड कपच्या दृष्टीने विराटच सलामीला कसा योग्य आहे, याबाबत चर्चेला सुरुवात झाली आहे. मात्र टीम इंडियाचा उपकर्णधार रोहित शर्माने मात्र यावर आपले मत व्यक्त केले आहे. टी-२० वर्ल्ड कपसाठी भारतीय संघाच्या फलंदाजीचा क्रम आतापासून ठरवणे रोहितला योग्य वाटत नाही अन् विराटचे सलामीला येणे ही केवळ इंग्लंडविरुद्धच्या निर्णायक लढतीसाठी केलेली चाल होती, असे तो म्हणाला. अर्थात स्वतः कर्णधार विराटचे मत मात्र वेगळे आहे. विराट म्हणतो, 'मी आयपीएलमध्येही डावाची सुरुवात करणार आहे आणि भारतात होणाऱ्या टी-२० वर्ल्ड कपमध्येही आघाडीला खेळणे मला आवडेल'. संघनिवडीबाबत रोहित म्हणाला की, "टी-२० वर्ल्ड कपला अजून अवधी आहे. त्याबाबतच्या संघाची निवड, त्याबाबतची चर्चा आम्ही एकत्र बसून करू. आज विराटने सलामीला येणे हा आमच्या डावपेचांचा एक भाग होता. आम्हाला एका फलंदाजाला बाहेर बसवावे लागणार होते. दुर्दैवाने लोकेश राहुलला वगळावे लागले. जो सर्वात कठीण निर्णय होतो." पाचव्या आणि महत्वाच्या ट्वेन्टी-२० सामन्यात लोकेश राहुलला वगळण्यात आले होते. याबाबत रोहितने सांगितले, "मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये राहुल हा आमचा प्रमुख खेळाडू आहे. खेळाडूंचा सध्याचा फॉर्म बघूनच संघव्यवस्थापनाने अंतिम अकरा निवडण्याचा निर्णय घेतला. मात्र यावरून भविष्यात राहुलचा विचारच होणार नाही, असा निष्कर्ष काढू नये. आजचा निर्णय हा या लढतीपुरता होता. वर्ल्ड कप जवळ आला की गोष्टी नक्की बदलतील".
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2NL6ztm
No comments:
Post a Comment