कराची : सध्याच्या घडीला जगावर करोना व्हायरसचे सावट आहे. आपण सर्वच करोनाशी लढताना योग्य ती खबरदारी घेत आहोत. पण पाकिस्तानचा एक खेळाडू करोना असूनही क्रिकेट खेळल्याची धक्कादायक बाब आता पुढे आली आहे. त्यामुळे आता पाकिस्तानच्या क्रिकेट मंडळाची डोकेदुखी वाढू शकते, असे म्हटले जात आहे. पाकिस्तानच्या एका क्रिकेटपटूमध्ये करोनाची लक्षणं पाहायला मिळाली होती. पण तरीही तो क्रिकेट सामना खेळल्याचे आता समजते आहे. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे या खेळाडूची करोना चाचणी तीन दिवस केली गेलीच नव्हती. अखेर चौथ्या दिवशी या खेळाडूची करोना चाचणी करण्यात आली आणि त्यावेळी हा क्रिकेटपटू करोना पॉझिटीव्ह असल्याचे पाहायला मिळाले. त्यानंतर या खेळाडूला क्वारंटारइन करण्यात आले. पण या क्रिकेटपटूला जेव्हा करोना झाला होता, त्यानंतर तो बऱ्याच जणांच्या संपर्कात आला होता. त्यामुळे आता हा खेळाडू ज्यांच्या संपर्कात आला होता त्या सर्वांच्या करोना चाचण्या कराव्या लागणार आहेत. पाकिस्तानचा स्थानिक क्रिकेटपटू बिस्मिल्लाह खानला आता करोना झाल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे त्याला आता क्वारंटाइन करण्यात आले आहे. पाकिस्तानमध्ये कायदे आझम करंडक खेळवला जातो. या स्पर्धेतील सामन्यात करोना असूनही बिस्मिल्लाह खान खेळला होता. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे या स्पर्धेतील सहाही संघ एकाच हॉटेलमध्ये थांबलेले होते. त्यामुळे पाकिस्तानच्या खेळाडूंसाठी ही धोक्याची घंटा ठरू शकते. पण पाकिस्तानच्या क्रिकेट मंडळाने यावेळी खेळाडू, सपोर्ट स्टाफ आणि सामनाधिकाऱ्यांची करोना चाचणी केल्याचे सांगितले आहे. पाकिस्तानच्या क्रिकेट मंडळाने याबाबत एक पत्रक काढले आहे. यामध्ये पीसीबीने म्हटले आहे की, " आम्ही सर्व १३२ खेळाडू, सपोर्ट स्टाफ आणि सामनाधिकाऱ्यांची करोना चाचणी केली आहे. या सर्वांच्या चाचणीचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत. त्यामुळे आम्ही शुक्रवारपासून या स्पर्धेला सुरुवात करत आहोत. करोनाचा सामना करण्यासाठी आम्ही काही योजना बनवल्या आहेत. त्याची योग्य ती अंमलबजावणी कशी करता येईल, याकडे आमचे लक्ष आहे."
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3euLmg1
No comments:
Post a Comment