नवी दिल्ली, : ऑस्ट्रेलियानंतर आता भारतीय संघ इंग्लंडच्या संघाशी दोन हात करणार आहे. काही दिवसांपूर्वी इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली. पण या संघात एकही कसोटी सामना न खेळलेल्या खेळाडूला संधी दिल्याचे पाहायला मिळत आहे. इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी अजिंक्य रहाणेकडून भारताचे कर्णधारपद विराट कोहलीकडे देण्यात आले. त्याचबरोबर भारताच्या या संघात जास्त फरकीपटूंना संधी देण्यात आली आहे. या फिरकीपटूंमध्ये आर. अश्विन, वॉशिंग्टन सुंदर आणि कुलदीप यादव यांच्या बरोबरच डावखुरा फिरकीपटू अक्षर पटेलला स्थान देण्यात आले आहे. अक्षरने आतापर्यंत एकही कसोटी सामना भारताकडून खेळलेला नाही. अक्षरचा आज वाढदिवस असल्यामुळे बीसीसीआयने त्याला शुभेच्छाही दिल्या आहेत. भारतीय संघात वेगवान गोलंदाज इशांत शर्माचे पुनरागमन झाले आहे. इशांतबरोबर जसप्रीत बुमरा, मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकूर यांच्याकडे वेगवान गोलंदाजीची धुरा सोपवण्यात आली आहे. भारताच्या सलामीसाठी यावेळी तीन पर्याय ठेवण्यात आले आहेत. यामध्ये रोहित शर्मा, शुभमन गिल आणि मयांक अगरवाल यांचा समावेश करण्यात आला आहे. पृथ्वी शॉ याला यावेळी संघातून डच्चू देण्यात आला आहे. या संघात भारताचा अष्टपैलू हार्दिक पंड्याचे पुनरागमन झाले आहे. त्याचबरोबर दुखापतीमुळे ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यात खेळू न शकणाऱ्या लोकेश राहुललाही या संघात स्थान देण्यात आले आहे. संघातील यष्टीरक्षणाची जबाबदारी यावेळी रिषभ पंत आणि वृद्धिमान साहा यांच्यावर सोपवण्यात आली आहे. त्याचबरोबर भारताचा तंत्रशुद्ध फलंदाज चेतेश्वर पुजाराने संघातील आपले स्थान कायम राखले आहे. टीम इंडियाचा ऑल राउंडर रविंद्र जडेजा इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतून संघाबाहेर झाला आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात जडेजाच्या अंगठ्याला दुखापत झाली होती. त्यानंतर त्याच्यावर ऑस्ट्रेलियात शस्त्रक्रिया करण्यात आली. या सर्वातून बाहेर येण्यासाठी त्याला सहा आठवड्यांचा कालावधी लागणार आहे. त्यामुळे आता जडेजा थेट आय़पीएलमध्येच खेळणार का, असा प्रश्न चाहते विचारत आहेत. त्यामुळे आता जडेजा कधी पूर्णपणे फिट होतो, याकडे सर्वांचे लक्ष असेल.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3p5Dpm7
No comments:
Post a Comment