कोलकाता : भारताचे माजी कर्णधार आणि बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांच्यावर आज दुसरी शस्त्रक्रीया करण्यात आली. गांगुली यांच्यावर जानेवारी महिन्याच्या सुरुवातीला पहिली शस्त्रक्रीया करण्यात आली होती. त्यानंतर २६ दिवसांत गांगुली यांच्यावर दुसरी शस्त्रक्रीया करण्यात आली आहे. त्याचबरोबर गांगुली यांच्यावर अजूनही काही महत्वाचे उपचार यावेळी करण्यात आले आहेत. अपोलो हॉस्पिटलच्या सूत्रांनी यावेळी सांगितले की, " गांगुली यांच्या आज सकाळी अँजिओग्राम आणि काही वैद्यकीय चाचण्या करण्यात आल्या होत्या. या चाचण्यांचा अहवाल आल्यावर गांगुली यांच्यावर अँजिओप्लास्टी करण्याचा निर्णय घेण्यात आला." हृदय रोग तज्ञ डॉ. देवी शेट्टी व अश्विन मेहता यांच्या उपस्थित आज गांगुली यांच्यावर अँजिओप्लास्टी करण्यात आली. यावेळी गांगुलीचे कौटुंबिक डॉक्टर आफताभ खानही उपस्थित होते. गांगुली यांच्यावर करण्यात आलेली अँजिओप्लास्टी ही यशस्वीपणे झाली आहे. अँजिओप्लास्टीनंतर गांगुली यांची प्रकृती स्थिर असून त्यांना डॉक्टरांच्या निगराणीखाली ठेवण्यात आले आहे. गांगुली यांना जेव्हा यापूर्वी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते, तेव्हा त्यांच्या तीन धमण्यांमध्ये रक्त प्रवाह योग्यपद्धतीने होत नसल्याचे पाहायला मिळाले होते. त्यावेळी गांगुली यांच्या एका धमनीमध्ये स्टेंट लावण्यात आला होता आणि त्यावेळी अँजिओप्लास्टीही करण्यात आली होती. बाकीच्या दोन धमन्यांमध्ये काही कालावधीनंतर स्टेंट बसवण्याचा निर्णय त्यावेळी डॉक्टरांनी घेतला होता. त्यानंतर सात जानेवारीला गांगुली यांना वुडलँड्स हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला होता. पण आज झालेल्या शस्त्रक्रीयेमध्ये गांगुली यांच्या दोन धमन्यांमध्ये यावेळी स्टेंट बसवण्यात आले आहेत. गांगुली यांच्यावर अँजिओप्लास्टी झाल्यावर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या हॉस्पिटलमध्ये पोहोचल्या होत्या आणि त्यांनी गांगुलीची भेटही घेतली. यावेळी ममता यांनी गांगुली यांच्या प्रकृतीची चौकशी केली. सौरव गांगुली यांची प्रकृती आता उत्तम आहे आणि ते लवकर बरे व्हावेत, यासाठी मी त्यांना शुभेच्छा देत आहे, असे ममता यांनी सांगितले. ममता यांच्यानंतर वरिष्ठ माकपा नेता अशोक भट्टाचार्य यांनीही गांगुलीची हॉस्पिटलमध्ये जाऊन भेट घेतली. गांगुली यांच्या कुटुंबियांतील सूत्रांनी यावेळी सांगितले की, " मंगळवारी संध्याकाळी आणि बुधवारी सकाळी गांगुली यांच्या छातीत दुखत होते. त्यानंतर त्यांच्या प्रकृतीची पाहणी डॉक्टर आफताभ खान यांनी केली. डॉक्टरांच्या सल्ल्यानंतरच गांगुली यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते."
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3onfMUZ
No comments:
Post a Comment