चेन्नई, : मराठमोळ्या अजिंक्य रहाणेकडे इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत सुवर्णसंधी आहे. कारण या मालिकेत अजिंक्य बरेच विक्रम मोडू शकतो, हे आता समोर आले आहे. मेलबर्नमध्ये कसोटी सामन्यात अजिंक्यने शतक झळकावले होते. या शतकाच्या जोरावर भारताला विजय मिळवता आला होता. आता इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत जर अजिंक्यने अशीच कामगिरी केली तर त्याला भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी, पॉली उम्रीगर, गुंडप्पा विश्वनाथ आणि मुरली विजय यांचे विक्रम मोडण्याची सुवर्णसंधी असेल. अजिंक्यने आतापर्यंत ६९ कसोटी सामन्यांमध्ये ४४७१ धावा केल्या आहेत, यामध्ये १२ शतकांचा समावेश आहे. जर इंग्लंडविरुद्धच्या चार सामन्यांच्या कसोटी मालिकेत अजिंक्यने ४०६ धावा केल्या, तर त्याला महेंद्रसिंग धोनीला मागे टाकण्याची नामी संधी असेल. धोनीने आतापर्यंत ९० कसोटी सामन्यांमध्ये ४८७६ धावा केल्या आहेत. त्यामुळे अजिंक्यने या मालिकेत दमदार कामगिरी केली तर त्याला धोनीलाही मागे सोडता येईल. अजिंक्यच्या नावावर आता १२ शतके आहेत. पॉली उम्रीगर आणि मुरली विजय यांच्या नावावरही प्रत्येकी १२ शतके आहेत. त्यामुळे अजिंक्यने या मालिकेत जर एक शतक झळकावले तर त्याला उम्रीगर आणि मुरली विजय यांना मागे सोडता येणार आहे. त्याचबरोबर अजिंक्यने या मालिकेत जर दोन शतके लगावली तर त्याला गुंडप्पा विश्वनाथ यांच्या १४ शतकांची बरोबरी करता येणार आहे. पण जर अजिंक्यने इंग्लंडविरुद्धच्या आठ डावांमध्ये तीन शतके लगावली तर त्याला विश्वनाथ यांचा शतकांचा विक्रमही मागे सोडता येईल. इंग्लंडविरुद्धची चार कसोटी सामन्यांची मालिका ही अजिंक्यसाठी फार महत्वाची ठरणार आहे. कारण अजिंक्य चांगल्या फॉर्मात आहे. त्यामुळे अजिंक्य या मालिकेत किती धावा करतो आणि कोणचा विक्रम मोडतो, याकडे नक्कीच सर्वांचे लक्ष असेल. अजिंक्यने ऑस्ट्रेलियाचा दौरा चांगलाच गाजवला होता. पण आता अजिंक्यकडे कर्णधारपद नसले तरी त्याच्याकडून कशी कामगिरी होते आणि तो किती धावा करतो, याकडे सर्वांचेच लक्ष असेल.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2MdKXF6
No comments:
Post a Comment