नवी दिल्ली : भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेतील काही क्षण आपण कधीच विसरु शकत नाही. लॉर्ड्सवर भारताने जिंकलेला अंतिम सामना आणि सौरव गांगुलीने काढलेले टी-शर्ट अजूनही सर्वांच्या डोळ्यासमोर असेल. पण क्रिकेटच्या इतिहासात असाच एक अविस्मरणीय क्षण आहे, ज्यावेळी इंग्लंडवर विजय मिळवल्यावर सिक्सर किंग युवराज सिंगने भारताचा माजी महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरला चक्क उचलून घेतले होते. नेमकं काय घडलं होतं, पाहा...मुंबईमध्ये २६ नोव्हेंबर २००८ साली दहशतवादी हल्ला झाला होता. त्यावेळी इंग्लंडचा संघ भारताच्या दौऱ्यावर होता. या हल्ल्यानंतर इंग्लंडच्या संघाने दौरा अर्धवट सोडण्याचा निर्णय घेतला होता. पण त्यानंतर इंग्लंडचा संघ डिसेंबर महिन्यात भारतात पुन्हा क्रिकेट खेळायला आला. इंग्लंडने यावेळी आपला दुसरा डाव ३११ धावांवर घोषित केला होता आणि भारतापुढे विजयासाठी ३८७ धावांचे आव्हान ठेवले होते. इंग्लंडच्या आव्हानाचा पाठलाग करताना वीरेंद्र सेहवाग आणि गौतम गंभीर यांनी धडाकेबाज सलामी दिली होती. या दोघांनी फक्त १०८ चेंडूंमध्ये १०० धावांची भागीदारी रचली होती. सेहवागने तर इंग्लंडच्या गोलंदाजीची पिसे काढली होती आणि फक्त ३२ चेंडूंत आपले अर्धशतकही झळकावले होते. सेहवागने यावेळी ६८ चेंडूंमध्ये ८३ धावांची खेळी साकारुन भारताच्या विजयाचा पाया रचला होता. गंभीरनेही यावेळी ६६ धावांचे योगदान दिले होते. सेहवाग आणि गंभीर बाद झाले तेव्हा भारताची २ बाद १४१ अशी अवस्था होती. पण त्यानंतर चार धावांमध्येच राहुल द्रविड आऊट झाला होता. त्यानंतर सचिन तेंडुलकर मैदानात उतरला होता. सचिनने यावेळी आपले अर्धशतक पूर्ण केले आणि व्हीव्हीएस लक्ष्मणबरोबर चांगली भागीदारी रचत संघाला दोनशे धावांचा पल्ला गाठून दिला होता. त्यानंतर सचिनने युवराज सिंगबरोबर मोठी भागीदारी रचली होती आणि संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले होते. सचिनने विनिंग शॉट मारत यावेळी आपले शतकही पूर्ण केले होते. त्यानंतर युवराजने सचिनला भर मैदानात उचलून घेतले होते. सचिनने यावेळी आपले हे शतक मुंबईच्या हल्ल्यातील शहिद झालेल्या व्यक्तींना समर्पित केले होते. सचिनने यावेळी नाबाद १०३ धावांची खेळी साकारली होती, तर युवराजने नाबाद ८५ धावांची खेळी साकारत विजयात मोलाचा वाटा उचलला होता.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3opNfOB
No comments:
Post a Comment