सिडनी, : सिडनी कसोटी सामन्याच्या दुसऱ्या डावात रोहित शर्माने अर्धशतक झळकावले. त्यानंतर रोहित जास्त काळ खेळपट्टीवर टिकू शकला नाही आणि ५२ धावांवर तो बाद झाला. पण बाद झाल्यावरही चाहते रोहितवर कौतुकाचा वर्षाव करताना दिसत आहेत. रोहितने सिडनीमधील खेळी साकारताना बरेच विक्रम केले आहेत. ऑस्ट्रेलियामध्ये सर्वाधिक षटके ठोकण्याचा विश्वविक्रम आता रोहितच्या नावावर आहे. ऑस्ट्रेलियामध्ये पाहुण्या संघांकडून सर्वाधिक षटकार ठोकण्याचा मान आता रोहितला मिळाला आहे. रोहितने आतापर्यंत ऑस्ट्रेलियामध्ये सर्वाधिक ५० षटकार लगावले आहेत. रोहितने आजच्या खेळीत ९८ चेंडूंत ५२ धावांची खेळी साकारली, यामध्ये पाच चौकार आणि एका षटकाराचा समावेश होता. या यादीमध्ये वेस्ट इंडिजचे महान फलंदाज विव रिचर्ड्स दुसऱ्या स्थानावर आहेत, त्यांनी ऑस्ट्रेलियामध्ये एकूण ४५ षटकार लगावले होते. त्याचबरोबर या यादीत तिसऱ्या स्थानावर वेस्ट इंडिजचा धडाकेबाज सलामीवीर ख्रिस गेल असून त्याच्या नावावर ३५ षटकार आहेत. ऑस्ट्रेलियामध्ये कसोटी सामन्यांमध्ये सर्वाधिक षटकार लगावणारा भारतीय खेळाडू आता रोहितच ठरला आहे. कारण रोहितने ऑस्ट्रेलियातील कसोटी सामन्यांमध्ये आतापर्यंत १० षटकार लगावले आहे. यापूर्वी भारताचा धडाकेबाज फलंदाज वीरेंद्र सेहवागने ऑस्ट्रेलियामध्ये कसोटी खेळताना आठ षटकार लगावले होते. रोहितने शुभमन गिलबरोबर खेळताना भारतीय संघाला ७१ धावांची सलामी करून दिली. गिल बाद झाल्यावर रोहितने विदेशी धर्तीवर आपले पहिले अर्धशतक झळकावले. रोहितला आयपीएल खेळताना दुखापत झाली होती. पण दुखापतीनंतर येऊन रोहितने सिडनीमध्ये अर्धशतक झळकावले आणि त्याच्यावर चाहत्यांनी सोशल मीडियावर कौतुकाचा वर्षाव करायला सुरुवात केली आहे. दुखापतीनंतर संघात येऊन अर्धशतक झळकावल्यावर चाहत्यांनी रोहितचे कौतुक केले आहे, त्याचबरोबर त्याची निवड कशी सार्थ आहे, हे दर्शवण्याचाही प्रयत्न केला आहे. दुखापतीमुळे रोहित ऑस्ट्रेलियातील पहिल्या दोन कसोटी सामन्यांमध्ये खेळू शकला नव्हता. पण तिसऱ्या कसोटी सामन्यात रोहितने अर्धशतक झळकावत दमदार पुनरागमन केल्याचे पाहायला मिळत आहे आणि चाहते त्याच्यावर फिदा झाले आहेत.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3bpmRRX
No comments:
Post a Comment