सिडनी : आतापर्यंत विराट कोहलीच आक्रमक कर्णधार आहे, असे बऱ्याच जणांना माहिती होते. पण अजिंक्य रहाणेही कर्णधार म्हणून आक्रमक असून तो चांगले नेतृत्व करेल, असा विश्वास ऑस्ट्रेलियाचे माजी महान क्रिकेटपटू इयान चॅपेल यांनी व्यक्त केला आहे. यावेळी चॅपेल यांनी अजिंक्यने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एका सामन्यात आक्रमक नेतृत्व केले होते, यावरही प्रकाशझोत टाकला आहे. याबाबत चॅपेल म्हणाले की, " भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील एक सामना धरमशाला येथे झाला होता. या सामन्यात अजिंक्यने भारताचे कर्णधारपद भूषवले होते. यावेळी अजिंक्य हा कसा आक्रमक कर्णधार आहे, हे पाहायला मिळाले होते. कारण त्यावेळी वॉर्नर फॉर्मात होता. त्यावेळी अजिंक्यने फिरकीपटू कुलदीप यादवला गोलंदाजी दिली आणि त्याचा हा निर्णय योग्य ठरल्याचे पाहायला मिळाले. कारण कुलदीपने वॉर्नरला बाद केले." चॅपेल पुढे म्हणाले की, " भारताला या सामन्यात जिंकण्यासाठी कमी धावा हव्या होत्या. पण खेळपट्टी फलंदाजीसाठी चांगली नव्हती आणि भारताच्या विकेट्सही पडल्या होत्या. त्यावेळी अजिंक्यने आक्रमक फलंदाजी करायला सुरुवात केली आणि संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला होता. माझ्यामते कसोटी क्रिकेटमध्ये आक्रमकपणा हा फार महत्वाचा असतो. त्यामुळे रहाणेचे नेतृत्व मला आवडते. कारण त्याची नेतृत्व करण्याची शैली ही भिन्न आहे. आतापर्यंत त्याला ज्यावेळी संधी मिळाली आहे, त्यावेळी रहाणेने चांगले नेतृत्व केले आहे. पण आता रहाणेला पुन्हा एकदा संधी मिळाली तर तो संघाचे चांगले नेतृत्व करू शकतो." भारताचा कर्णधार विराट कोहली हा ऑस्ट्रेलियामध्ये एकच कसोटी सामना खेळणार आहे. त्यानंतर कोहली हा मायदेशी परतणार आहे. भारतीय संघाचा उपकर्णधार हा अजिंक्य रहाणे आहे. त्यामुळे कोहली भारतात परतल्यावर भारतीय संघाची धुरा अजिंक्य रहाणेकडे येणार आहे. त्यामुळे अजिंक्यला आपले नेतृत्वगुण दाखवून देण्याची ही चांगली संधी आहे, असे म्हटले जात आहे. कारण ऑस्ट्रेलियामध्ये कसोटी सामना जिंकणे, ही सोपी गोष्ट नसते. त्यामुळे अजिंक्य यावेळी संघ कसा हाताळतो आणि भारताला विजय मिळवून देतो का, याकडे सर्व चाहत्यांचे लक्ष लागून राहिलेले असेल.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/36Z15BS
No comments:
Post a Comment