नवी दिल्ली, : भारताने दुसऱ्या कसोटी सामन्यात विजय मिळवला असला तरी आता तिसऱ्या कसोटी सामन्यापासून संघाची डोकेदुखी वाढणार असल्याचे समजते आहे. कारण ऑस्ट्रेलियाच्या संघात तिसऱ्या कसोटी सामन्यापासून एका धडाकेबाज फलंदाजाची एंट्री होणार असल्याची बातमी आता पुढे आली आहे. गोलंदाजांचा कर्दनकाळ अशी बिरुदावली मिरवणारा डेव्हिड वॉर्नर तिसऱ्या कसोटी सामन्यापासून ऑस्ट्रेलियाच्या संघात दाखल होणार आहे, अशी बातमी आता पुढे येत आहे. आतापर्यंत ऑस्ट्रेलियाच्या धावा दोन्ही कसोटी सामन्यांमध्ये जास्त झाल्या नव्हत्या. त्यामुळे वॉर्नर संघात आल्यावर ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजीला बळकटी मिळेल, असे वाटत आहे. वॉर्नरबरोबर यावेळी अजून दोन खेळाडूंचा ऑस्ट्रेलियाच्या संघात समावेश झाला आहे. वॉर्नरबरोबरच ऑस्ट्रेलियाच्या संघात विल पुकोवस्कीचाही समावेश होणार असल्याचे पाहायला मिळत आहे. त्याचबरोबर दुखापतीमुळे संघाबाहेर असलेला वेगवान गोलंदाज सीन अॅबॉटचेही यावेळी ऑस्ट्रेलियाच्या संभाव्य संघात पुनरागमन होणार असल्याचे दिसत आहे. दुसऱ्या सामन्यात पराभवाचा धक्का बसल्यावर ऑस्ट्रेलियाने तिसऱ्या कसोटी सामन्यासाठी आपल्या संघात महत्वाचे बदल केले आहेत. त्यामुळे हे बदल आता संघाच्या किती पथ्यावर पडतात, याची उत्सुकता चाहत्यांना नक्कीच असेल. पण ऑस्ट्रेलियाच्या संघाची अधिकृत घोषणा अजून होणे बाकी आहे. भारतीय संघातही होऊ शकतात हे तीन महत्वाचे बदलतिसऱ्या सामन्यासाठी भारतीय संघातून दोन खेळाडूंना डच्चू मिळू शकतो, असे वाटत आहे. तिसऱ्या सामन्यासाठी सलामीवीर मयांक अगरवाल आणि हनुमा विहारी या खेळाडूंना संघाबाहेर ठेवले जाऊ शकते. त्याचबरोबर संघात रोहित शर्मा आणि लोकेश राहुल यांना स्थान देण्यात येऊ शकते. त्याचबरोबर एक महत्वाचा बदल भारतीय संघात होऊ शकतो. भारताचा वेगवान गोलंदाज उमेश यादव हा दुसऱ्या सामन्यात दुखापतग्रस्त झाला आहे. त्यामुळे तो तिसऱ्या सामन्यात खेळणार की नाही, याबाबत साशंकता आहे. त्याचबरोबर मोहम्मद शमीही दुखापतीमुळे या दौऱ्यात खेळू शकणार नाही. त्यामुळे तिसऱ्या सामन्यात जर उमेश खेळू शकणार नसेल, तर त्याच्या जागी मराठमोळा शार्दुल ठाकूर किंवा नवदीप सैनी या दोन युवा वेगवान गोलंदाजांना संधी मिळू शकते. त्यामुळे तिसऱ्या सामन्यात नेमके कोणते बदल होतात, याची उत्सुकता सर्वांनाच असेल.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3nZliOd
No comments:
Post a Comment