मेलबर्न, : तिसऱ्या कसोटी सामन्यात रोहित शर्मा खेळणार, यासाठी भारताचा कर्णधार अजिंक्य रहाणे आनंदी होता. ही गोष्ट अजिंक्यने विजयानंतर बोलूनही दाखवली. पण आता रोहितला जर तिसरा सामना खेळायचा असेल तर त्याला काही अडचणींचा सामना करावा लागू शकतो, असे सध्या दिसत आहे. रोहितला आयपीएलमध्ये खेळताना दुखापत झाली होती. त्यामुळेच तो भारतीय संघाबरोबर ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर जाऊ शकला नव्हता. त्यानंतर ररोहित हा राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये गेला आणि त्याने आपल्या फिटनेसवर भर दिला. फिटनेस टेस्ट पास झाल्यावर रोहितला ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर पाठवण्यात आले. ऑस्ट्रेलियात पोहोचल्यावर रोहित हा १४ दिवस क्वारंटाइनमध्ये होता. पण आता जर रोहितला सामना खेळायचा असेल तर त्याच्यापुढे नेमक्या कोणत्या अडचणी असतील, पाहा... रोहित फिट असला आणि त्याने क्वारंटाइनचे नियम पाळेलेले असले तरी सामना खेळण्यापूर्वी संघ व्यवस्थापन त्याच्याबरोबर संवाद साधणार आहे. त्याचबरोबर रोहित हा शारीरिक आणि मानसीकरीत्या फिट आहे की नाही, याबाबत संघ व्यवस्थापन जाणून घेणार आहे. संघ व्यवस्थापनाला जर रोहित फिट आहे, असे वाटत असेल तरच त्याला तिसऱ्या कसोटी सामन्यात खेळण्याची संधी देण्यात येणार आहे. याबाबत संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी सांगितले की, " रोहित १४ दिवस क्वारंटाइनमध्ये होता. त्यामुळे रोहित आता सामना खेळण्यासाठी शारीरिक आणि मानसीकरीत्या फिट आहे की नाही, हे पहिल्यांदा पाहावे लागेल. यासाठी संघ व्यवस्थापन रोहितशी संवाद साधणार आहे. रोहित जर फिट असेल तरच त्याला तिसऱ्या कसोटी सामन्यासाठी संघात स्थान देण्यात येऊ शकते." विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारताला ऑस्ट्रेलियातील पहिल्या कसोटी सामन्यात मानहानीकारक पराभव पत्करावा लागला होता. पण दुसऱ्या कसोटी सामन्यात अजिंक्य रहाणेकडे भारताचे नेतृत्व आले आणि भारताला विजय मिळाला. आता तिसऱ्या कसोटी सामन्यात कोणता संघ बाजी मारतो, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असेल. अजिंक्य विजयानंतर म्हणाला की, " मी या विजयाचे श्रेय शुभमन गिल आणि मोहम्मद सिराज यांना देईन. कारण पहिल्या सामन्यातील पराभवानंतर खेळणे सोपे नव्हते. त्यामध्येच या दोन्ही खेळाडूंचे पदार्पण होते. त्यामुळे त्यांच्यावर प्रचंड दडपण असेल. पण या दोघांनी दडपण जुगारले आणि नेत्रदीपक कामगिरी केली. या दोघांच्या कामगिरीचा वाटा विजयात नक्कीच मोलाचा आहे."
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/38GTxU0
No comments:
Post a Comment