मेलबर्न, : भारतीय संघाला सध्याच्या घडीला धडाकेबाज फलंदाज रोहित शर्माची उणीव भासत आहे. कारण विराट कोहली हा मायदेशी परतणार असून तो आगामी तीन कसोटी सामन्यांमध्ये खेळू शकणार नाही. त्यामुळे भारतीय संघात रोहितचा समावेश नेमका कधी होणार, याची उत्सुकता चाहत्यांना असून त्याबाबतची अपडेटही आता आली आहे. रोहित शर्मा दुखापतीमुळे भारतीय संघाबरोबर ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्याला जाऊ शकला नव्हता. पण रोहित आता पूर्णपणे फिट असून तो १६ डिसेंबरला ऑस्ट्रेलियामध्ये दाखल झाला आहे. सिडनीमध्ये रोहितला क्वारंटाइन करण्यात आले आहे. त्यामुळे रोहित हा क्वारंटाइनचा कालावधी कधी संपणार आणि भारतीय संघात येणार, याची सर्वांनाच उत्सुकता आहे. रोहित १६ डिसेंबरला सिडनीमध्ये दाखल झाला होता. त्यानंतर तो १४ दिवस क्वारंटाइनमध्ये असेल. त्यामुळे रोहित ३० जानेवारीला भारतीय संघात प्रवेश करू शकतो, अशी माहिती पुढे येत आहे. त्यामुळे भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसऱ्या सामन्यात रोहित आपल्याला खेळताना दिसू शकतो. सिडनीमध्ये गेल्या काही दिवसांमध्ये करोनाच्या रुग्णांमध्ये वाढ झालेली पाहायला मिळत आहे. त्यामुळे तिसरा कसोटी सामना सिडनीला होणार की नाही, याबाबत साशंकता आहे. पण भारताचा धडाकेबाज फलंदाज रोहित शर्मा हा सिडनीमध्येच आहे. त्यामुळे रोहित शर्मा सिडनीमध्ये सुरक्षित आहे की नाही, अशा प्रश्न चाहत्यांना पडलेला होता. त्यावर आता बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांनी खुलासा केल्याचे पाहायला मिळत आहे. रोहित सध्याच्या घडीला सिडनी येथील एका हॉटेलमध्ये आहे आणि तो हॉटेलच्या रुममध्ये एकटाच राहत असल्याचे समजते आहे. याबाबत बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांनी एएनआयला दिलेल्या मुलाखतीमध्ये सांगितले की, " रोहित शर्माच्या संपर्कात भारतीय संघ व्यवस्थापन सातत्याने आहे. तो सध्या क्वारंटाइन असून बायो-सिक्युअर वातावरणात आहे. तो आपल्या रुममध्ये एकटाच आहे. तिथे जर काही वाईट परिस्थिती निर्माण झाली आणि रोहितला जर सिडनीमधून बाहेर काढायचे असेल तर ते प्रयत्नदेखील नक्कीच आम्ही करु. पण सध्याच्या घडीला रोहित हा सुरक्षित आहे."
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3rqIiYC
No comments:
Post a Comment