नवी दिल्ली : भारताचे माजी कर्णधार बिशनसिंग बेदी यांनी आज एक धक्कादायक निर्णय घेतले आहे. त्यांनी दिल्ली क्रिकेट संघटनेचे सदस्यत्व सोडले असून त्यांनी फिरोजशाह कोटला या मैदानातील स्टँडला दिलेले आपले नावही हटवण्याची मागणी केली आहे. दिल्ली क्रिकेट संघटनेचे अध्यक्षपद हे दिवंगत भारताचे नेते अरुण जेटली यांचे पुत्र रोहन यांच्याकडे आहे. रोहन यांच्या कारभारावर नाराजी व्यक्त करत बेदी यांनी हे पाऊल उचलले आहे. याबाबत बेदी यांनी रोहन यांना एक पत्र लिहिले आहे. या पत्रामध्ये बेदी यांनी म्हटले आहे की, " मला माझ्या स्वत:वर गर्व आहे, कारण मी फार सहनशील आणि धैर्यवान आहे. पण ज्यापद्धतीने दिल्ली क्रिकेट संघटनेमध्ये काम सुरु आहे त्याने मला हा निर्णय घ्यायला भाग पाडले आहे. मी माझे सदस्यत्व सोडत असून फिरोजशाह कोटला या स्टेडियमच्या एका स्टँडला माझे नाव देण्यात आले आहे, ते हटवण्यात यावे, अशी मी आपल्याला अपील करत आहे. मी हा निर्णय विचारपूर्वक घेतलेला आहे." बेदी यांनी असा निर्णय का घेतला, पाहा...फिरोजशहा कोटला मैदानात अरुण जेटली यांचा पुतळा बसविण्याचे प्रयत्न सुरु आहेत. या गोष्टीला बेदी यांचा कडाडून विरोध आहे. त्यामुळेच फिरोजशाह कोटला मैदानात असलेल्या स्टँडवरील माझं नाव काढा आणि माझं प्राथमिक सदस्यत्वही रद्द करा, अशी भूमिका बेदी यांनी यावेळी घेतल्याचे पाहायला मिळाले आहे. बेदी यांचे समर्थन यावेळी भारताचे माजी क्रिकेटपटू मदन लाल यांनीही केले आहे. दोन वर्षांपूर्वी फिरोजशाह कोटला मैदानात असलेल्या एका स्टँडला बिशन सिंग बेदी यांचे नाव देण्यात आले होते. बेदी यांनी भारताकडून बरेच वर्ष क्रिकेट खेळले होते, त्याचबरोबर भारताच्या ऐतिहासिक विजयात बेदी यांचा महत्वाचा वाटा होता. त्याचबरोबर बेदी यांनी दिल्लीच्या संघाला दोनवेळा रणजी करंडक चषकही जिंकवून दिला होता. त्यामुळे बेदी यांचे नाव फिरोजशाह कोटला मैदानात असलेल्या एका स्टँडला देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. बेदी यांच्या या निर्णयामुळे दिल्ली क्रिकेट संघटनेमधील वातावरण चांगलेच तापलेले पाहायला मिळत आहे. त्यामुळे बेदी विरुद्ध रोहन जेटली असा सामनाही दिल्लीच्या क्रिकेट संघटनेत पाहायला मिळू शकतो, असे म्हटले जात आहे.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3hdVP0J
No comments:
Post a Comment