मेलबर्न, : भारताचा कर्णधार विराट कोहली हा ऑस्ट्रेलियातील फक्त एक कसोटी सामना खेळून भारतात परतणार आहे. काही आजी-माजी क्रिकेटपटूंना ही गोष्ट पटलेली नाही. एका दिग्गज माजी क्रिकेटपटूने कोहलीवर याबाबत सडकून टीका केली आहे. त्याचबरोबर विराट कोहलीसारखा मी संघाला अर्ध्यावर सोडून भारतात आलो नसतो, असेही त्यांनी म्हटले आहे. विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात मानहानीकारक पराभव पत्करावा लागला होता. त्यानंतर कोहलीसारख्या अनुभवी खेळाडूची भारतीय संघाला नितांत गरज आहे. पण कोहलीने अशा परिस्थितीत संघाबरोबर राहायला हवे होते, असे मत भारताच्या माजी क्रिकेटपटूने व्यक्त केले आहे. विराट कोहलीवर टीका करताना भारताचे माजी दिग्गज क्रिकेटपटू दिलीप दोशी यांनी सांगितले की, " माझ्यासाठी राष्ट्रीय कर्तव्य पहिले आहे. जर मी विराटच्या जागी असलो असतो तर कोणताही विचार न करता मी पहिल्यांदा संघाचाच विचार केला असता. मी नेहमीच भारतीय संघाबरोबर उभा राहिलो असतो. त्यामुळे माझ्यासाठी भारतीय संघ हेच प्रथम प्राधान्य असले असते." दोशी यांनी पुढे सांगितले की, " माझ्यामते हा विराट कोहलीचा वैयक्तिक निर्णय आहे, त्यामुळे त्याच्यावर कोणीही दवाब आणू शकत नाही. कारण प्रत्येकालाच आपल्या नवजात बाळाबाबत उत्सुकता असते आणि त्यावेळी आपल्या पत्नीबरोबर आपण असावे, असे वाटू शकते. पण माझ्यासाठी भारतीय संघ हा नेहमीच प्राथमिकता असेल आणि मी सर्व गोष्टींपेक्षा भारतीय संघालाच पहिले प्राधान्य देईन." विराट कोहली आणि त्याची पत्नी अनुष्का शर्मा यांच्या घरी जानेवारी महिन्यात पाळणा हलणार आहे. त्यामुळे कोहलीने जेव्हा ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्याची निवड करण्यात आली होती, तेव्हाच आपण फक्त एकच कसोटी सामना खेळणार असून त्यानंतर मी मायदेशी परतणार आहे, अशी भूमिका घेतली होती. त्यानुसार कोहली हा ऑस्ट्रेलियातील पहिला कसोटी सामना खेळून मायदेशी परतण्यासाठी रवाना झाला आहे. विराटला भारतात आल्यावर क्वारंटाइन व्हावे लागणार असून त्यानंतरच तो अनुष्काला भेटू शकतो.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2JeTWEt
No comments:
Post a Comment