नवी दिल्ली, : भारताच्या चाहत्यांना एक आनंदाची बातमी मिळाली आहे. कारण भारताचा धडाकेबाज फलंदाज रोहित शर्मा हा ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यासाठी रवाना झाला आहे. भारताचा स्टार सलामीवीर रोहित शर्माने फिटनेस टेस्ट पास केली होती. राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये शुक्रवारी फिटनेस टेस्ट झाल्यानंतर आता रोहित ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या अखेरच्या दोन कसोटीत खेळू शकणार आहे. त्यासाठी रोहित आज सकाळी ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यासाठी रवाना झाला आहे. रोहित हा मुंबईहून दुबईला जाणार आहे आणि दुबईवरुन तो थेट सिडनीला पोहोचणार आहे. भारतीय संघ सध्या ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर असून या दोन्ही संघात वनडे आणि टी-२० मालिका झाली आहे. या दोन्ही मालिकेत अनेकदा उप कर्णधार रोहित शर्माची कमी जाणवत होती. आता कसोटी मालिकेला १७ डिसेंबरपासून सुरूवात होत आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाण्यासाठी आज रोहितची बेंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत अर्थात एमसीए येथे फिटनेस टेस्ट झाली. युएईमध्ये झालेल्या आयपीएलच्या १३व्या हंगामात त्याला हॅमस्ट्रिंगची दुखापत झाली होती. त्यानंतर NCA मध्ये तो फिटनेसवर काम करत होता. फिटनेससाठी तो १९ नोव्हेंबरला बेंगळुरूमध्ये आला होता. ऑस्ट्रेलिया दौऱ्यात निवड समितीने रोहितला दुखापतीमुळे संधी दिली नव्हती. त्यावरून बराच वाद झाल्यानंतर आयपीएलमधील फिटनेस पाहता त्याचा कसोटी संघात समावेश करण्यात आला होता. फिटनेस टेस्ट पास झाल्यामुळे आता रोहितला ऑस्ट्रेलियाला कधी पाठवायचे याबाबतचा निर्णय बीसीसीआय आणि निवड समिती घेणार होती. रोहित आधीच पहिल्या दोन कसोटी सामन्यातून बाहेर झाला आहे. तिकडे ऑस्ट्रेलियात विराट कोहली पहिल्या कसोटी सामन्यानंतर भारतात परत येईल. कोहली भारतात परतल्यानंतर त्याच्या जागी रोहित सारखा फलंदाज संघात असेल तर भारतासाठी आश्वासक ठरू शकते. रोहितने भारताकडून २२४ वनडे, १०८ टी-२० लढती आणि ३२ कसोटी खेळल्या आहेत. रोहितने ३२ कसोटीत ४६.५४च्या सरासरीने २ हजार १४१ धावा केल्या आहेत. यात ६ शतक आणि १० अर्धशतकांचा समावेश आहे. २१२ ही त्याची सर्वोच्च धावसंख्या आहे.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3gPVjWC
No comments:
Post a Comment