सिडनी, : भारताचा ऑफस्पिनर रवीचंद्रन अश्विनने सिडनी कसोटीत चिवट खेळाचे प्रदर्शन करत सामना वाचविला आणि तमाम क्रिकेटचाहत्यांकडून शाबासकी मिळविली. पण त्याच्या या चिवट खेळीला मैदानात नव्हे तर सकाळी उठल्यापासूनच खरे तर सुरुवात झाली होती. कारण अश्विनला पाठिच्या दुखण्यामुळे बुटाची लेस बांधणेही कठीण जात होते. पण तरीही मैदानात अश्विनने कमाल केली आणि तो लढत राहील्याचे पाहायला मिळाले. अश्विनची पत्नी प्रितीने अश्विनच्या या जिद्दीचे वर्णन यानिमित्ताने केले आहे. ती म्हणाली की, "सोमवारी सकाळी जेव्हा अश्विन उठला तेव्हा त्याची पाठ प्रचंड दुखत होती. त्याला उभे राहणेही मुश्किल होत होते. सामन्यासाठी तयार होताना त्याला बुटाची लेस बांधणेही कठीण जात होते." अश्विनने या सामन्यात १२८ चेंडूंचा सामना करत ३९ धावांची खेळी केली. पण या खेळीमुळे ऑस्ट्रेलियाचे या सामन्यात विजय मिळवून मालिकेत आघाडी घेण्याचे स्वप्न उद्ध्वस्त झाले. प्रितीने ट्विट करत अश्विनची ही कथा सांगितली. तिने लिहिले की, "रविवारी रात्री अश्विन झोपी गेला तेव्हाच त्याच्या पाठीत उसण भरली होती. प्रचंड वेदना होत होत्या. सकाळी जेव्हा तो उठला तेव्हा त्याला सरळ उभे राहणेही शक्य होत नव्हते. बुटाच्या लेस बांधण्यासाठी त्याला वाकताही येत नव्हते. पण अशा परिस्थितीतही त्याने जी जिद्द दाखविली त्याचे कौतुक करावे तेवढे थोडे आहे." पत्नीने केलेल्या या कौतुकानंतर अश्विननेही तिचे आभार मानले. या कठीण समयी तिने आपल्याला जो पाठिंबा दिला त्याबद्दल तो कृतज्ञ असल्याचे त्याने सांगितले. चौथ्या कसोटी सामन्यापूर्वी आर. अश्विनच्या पाठीमध्ये उसण भरल्याचेही समजत आहे. तिसरा सामना खेळत असताना अश्विनला पाठीमध्ये दुखापत झाली होती, ही दुखापतही गंभीर असल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे आता चौथ्या कसोटी सामन्यात अश्विन खेळणार की नाही, याबाबतत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. त्यामुळे चौथ्या कसोटीसाठी संघाची निवड करताना भारतीय संघाची चांगलीच कसोटी लागणार आहे, असे म्हटले जात आहे.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3sgSKC5
No comments:
Post a Comment