मुंबई, विनायक राणे : भारताच्या सौरभ वालकरची नुकतीच अफगाणिस्तान क्रिकेट संघाच्या कामगिरी विश्लेषकपदी (परफॉर्मन्स अनालिस्ट) नेमणूक करण्यात आली आहे. मुलाखती दरम्यान सौरभने अफगाणिस्तान क्रिकेटच्या भविष्याच्या दृष्टिने मांडलेला विचार मुख्य प्रशिक्षक लान्स क्लुजनर (दक्षिण आफ्रिकेचे माजी कसोटीपटू) यांना भावला अन् सौरभचे नाव पदासाठी निश्चित झाले. ‘आगामी टी-२० वर्ल्ड कपच्या दृष्टिकोनातून अफगाणिस्तानचे व्हिजन काय असायला हवे हे मी मुलाखतीदरम्यान मांडले. जे त्यांना भावले’, असे मुळचा दादरकर अन् आता पुण्यात राहत असलेल्या सौरभने मटाशी संवाद साधताना सांगितले. लहानपणापासून सौरभला गणिताची आवड या प्रेमाचा फायदा मग लाडक्या क्रिकेटमध्येही झाला. विविध विक्रम, आकडेवारी, खेळाडूंची शतके, मैदानांची माहिती, खेळाडूंची शैली, तंत्र हे सौरभला सुरुवातीपासूनच तोंडपाठ असे. आयपीएलमधील राजस्थान रॉयल्स संघ, बांगलादेश प्रीमियर लीग, कॅरेबिनय प्रीमियर लीगमध्ये सौरभने कामगिरी विश्लेषकाची भूमिका जावली आहेच; पण २००८ ते २०१८ या अप्रुप वाटवा अशा कालावधीत त्यांनी मुंबई संघाच्या कामगिरी विश्लेषकपदाची जबाबदारी यशस्वी पार पाडली आहे. या कालावधीत सौरभने अमोल मुझुमदार, सचिन तेंडुलकर, झहीर खान, अजिंक्य रहाणे, रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव अशा खेळाडूंसह काम केले आहे. असे अनुभव गाठीशी घेत ३५ वर्षांचा हा मराठमोठा तरुण आता क्रिकेटमध्ये झपाट्याने प्रगती करणाऱ्या अफगाणिस्तानसाठी काम करणार आहे. दुबईत पार पडलेल्या टी-१० लीगसाठी सौरभ यांनी काम केले आहे. गंमत वाटेल, पण सौरभने क्रिकेटचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण वैगरे घेतले नाही. शिवाजी पार्क परिसरातच बालपण गेले, बालमोहन शाळेत त्याचे शालेय शिक्षण पूर्ण झाले. पोर्तुगीज चर्च समोरील मैदान आणि पार्कात सौरभला रबरी चेंडूने क्रिकेट खेळताना पाहून काही संघांनी त्याला स्पर्धांसाठी निमंत्रित केले. सौरभने टाइम्स शील्ड ‘क’ गटातील एनटीसी (नॅशनल टेक्स्टाइल कॉर्पोरेशन) संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. -कामगिरी विश्लेषक म्हणजे नेमकं काय, पाहा...आधुनिक क्रिकेटमध्ये कामगिरी विश्लेषकाची भूमिका खूप महत्त्वाची मानली जाते. संघातील फलंदाज, गोलंदाजांसह क्षेत्ररक्षणातही कामगिरी विश्लेषकाची भूमिका खूप महत्त्वाची मानली जाते. फलंदाजाला जसे प्रशिक्षक, मार्गदर्शकाची आवश्यकता तशीच या विश्लेषकाची गरजही असते. आपल्या संघासह खासकरुन प्रतिस्पर्धी संघांच्या खेळाडूंची इतंभूत माहिती विश्लेषक ठेवतात. तसे तांत्रिक मार्गदर्शन करणे, प्रतिस्पर्ध्यांनुसार संघाला डावपेच आखण्यात मदत करण्याची कामगिरी विश्लेषक करतो. प्रतिस्पर्ध्यांचे पक्के, कच्चे दुवे आणि कामगिरीची आकडेवारी या विश्लेषकांना तोंडपाठ असते, ज्यावरून संघाचे डावपेच ठरतात. सौरभ वालकर पुढे म्हणाले की, ‘पूर्वी अफगाणिस्तान संघ जिंकला की बातमी व्हायची. कारण नवख्या संघाने मिळवलेला विजय वेगळाच असतो. आता तसे नाही, कारण प्रस्थापितांना धक्के देत विजय मिळवण्याची सवय या संघाला लागली आहे. आता एक पाऊल पुढे टाकत टी-२० वर्ल्ड कपचे ध्येय समोर ठेवले आहे.’
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3saDE14
No comments:
Post a Comment