सिडनी, : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय संघाला मानहानीकारक पराभव पत्करावा लागला. आतापर्यंतच्या इतिहासात भारतीय संघाकडून सर्वात निचांकी धावसंख्याही नोंदवली गेली. पण या जिव्हारी लागणाऱ्या पराभवानंतर भारताचा फिरकीपटू आर. अश्विनला एक आनंदाची बातमी मिळाली आहे. अश्विनने पहिल्या कसोटी सामन्यात चांगली गोलंदाजी केली होती. पहिल्या डावात अश्विनने चार बळी मिळवले होते. यामध्ये स्टीव्हन स्मिथसारख्या अनुभवी खेळाडूला फक्त एकाच धावेवर बाद करण्याचा पराक्रम केला होता. त्याचबरोबर दुसऱ्या डावातही अश्विनने एक बळी मिळवला होता आणि सामन्यात एकूण ५ विकेट्स अश्विनने घेतले होते. पहिल्या सामन्यात पाच विकेट्स मिळवण्याचा फायदा यावेळी अश्विनला झाला आहे आणि त्याला एक आनंदाची बातमी मिळाली आहे. या सामन्यातील कामगिरीच्या जोरावर अश्विनने आयसीसीच्या कसोटी क्रमवारीत नववे स्थान पटकावले आहे. त्याचबरोबर या क्रमवारीत भारताचा अव्वल गोलंदाज ठरण्याचा मानही यावेळी अश्विनला मिळाला आहे. या सामन्यापूर्वी अश्विन हा गोलंदाजांच्या कसोटी क्रमवारीत अव्वल दहा गोलंदाजांमध्ये नव्हता, पण दमदार कामगिरीच्या जोरावर त्याने नववे स्थान पटकावले आहे. भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमरा यावेळी क्रमवारीत १०व्या स्थानावर आहे. कोणत्या गोलंदाजाला झाला सर्वाधिक फायदा, पाहा...ऑस्ट्रेलियाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला होता तो वेगवान गोलंदाज जोश हेझलवूडने. कारण जोशने दुसऱ्या डावात फक्त आठ धावा देत पाच विकेट्स मिळवल्या होत्या. त्यामुळे जोश क्रमवारीत नवव्या स्थानावरून पाचव्या स्थानावर पोहोचला आहे. २०१८नंतर पहिल्यांदाच जोश हा अव्वल पाच गोलंदाजांमध्ये पोहोचल्याचे पाहायला मिळाले आहे. ऑस्ट्रेलियाचा दुसरा वेगवान गोलंदाज पॅट कमिन्स हा गोलंदाजी क्रमवारीत अव्वल स्थानावर आहे. कमिन्सने दुसऱ्या डावात २१ धावांमध्ये चार विकेट्स मिळवल्या होत्या. त्याचबरोबर ९१० गुणांसह तो या क्रमवारीत अव्वल स्थानावर विराजमान आहे. त्यामुळे आता दुसऱ्या सामन्यात भारताचा कोणता गोलंदाज दमदार कामगिरी करू क्रमवारीत मानाचे स्थान पटकावतो, याकडे भारताच्या चाहत्यांचे लक्ष असेल.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2KmFDy8
No comments:
Post a Comment