नवी दिल्ली : गेल्या दहा वर्षांतील सर्वोत्तम क्रिकेटपटू कोण, असा प्रश्न भारताचे माजी महान फलंदाज आणि समालोचक सुनील गावस्कर यांना विचारण्यात आला होता. यावेळी गावस्कर यांच्यापुढे माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी आणि विद्यमान कर्णधार विराट कोहली, असे दोन पर्याय ठेवण्यात आले होते. यावेळी गावस्कर यांनी धोनी आणि कोहली यांच्यामधील एकाचीच निवड केली आहे. याबाबत गावस्कर म्हणाले की, " जर तुम्ही व्यक्तिगत कामगिरी पाहिली तर गेल्या १० वर्षातील सर्वोत्तम क्रिकेटपटू मला विराट कोहली वाटतो. कारण कोहलीने एक फलंदाज म्हणून दमदार कामगिरी केली आहे. त्याचबरोबर धावांचा पाठलाग करताना कोहलीने उत्तम कामगिरी केली आहे आणि त्याच्या या कामगिरीच्या जोरावर भारताने बरेच सामने जिंकले आहेत." गावस्कर यांनी पुढे सांगितले की, " मी हे सर्व सांगत असताना फक्त धावा किंवा विकेट्स पाहत नाही, तर एखाद्या खेळाडूचा प्रभाव मी पाहतो. याबाबतीमध्ये तुम्हालाही मानावे लागेल की हे जे दशक आहे ते विराट कोहलीच्याच नावावर असेल. कारण भारतीय संघाने जे सामने जिंकले आहेत त्यामध्ये कोहलीचा प्रभाव सर्वाधिक आहे. त्यामुळे या दशकातील सर्वोत्तम क्रिकेटपटू मला कोहली वाटतो." ऑस्ट्रेलियाचा माजी धडाकेबाज सलामीवीर मॅथ्यू हेडनलाही हाच प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावेळी हेडनने सांगितले की, " मला सर्वात महत्वाचे वाटते की, धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने विश्वचषक आणि चॅम्पियन्स ट्रॉफी करंडक स्पर्धा जिंकली आहे. माझ्यासाठी विश्वचषक हा मैलाचा दगड आहे, तो सर्वात महत्वाचा समजला जातो. माझ्यामते धोनीला मी पसंती देईन. कारण विश्वचषक खेळत असताना तुमच्यावर फार मोठे दडपण असते त्यावेळी एक चांगला कर्णधार तोच असतो जो शांतपणे सर्व निर्णय घेत असतो. हे गुण धोनीमध्ये आपण सर्वांनीच पाहिले आहे. धोनी हा एक सर्वोत्तम कर्णधार म्हणून सर्वांनाच परिचीत आहे. त्याचबरोबर एक खेळाडू म्हणूनही धोनीने चांगले नाव कमावलेले आहे."
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/375guAH
No comments:
Post a Comment