अॅडलेड : : भारताला पहिल्याच सामन्यात मानहानीकारक पराभव पत्करावा लागला. हा पराभव भारतीयांच्या चांगलाच जिव्हारी लागला आहे. या पराभवानंतर भारताचे माजी कर्णधार सुनील गावस्कर यांनी जोरदार टीका केली आहे. या सामन्यानंतर गावस्कर म्हणाले की, " जेव्हापासून कसोटी क्रिकेट खेळायला भारताने सुरुवात केली तेव्हापासून ही आतापर्यंतची सर्वात कमी धावसंख्या आहे. हे पाहून कधीही चांगले वाटणार नाही. पण मला असे वाटते की, जे संघ या प्रकराच्या गोलंदाजीचा सामान करायला उतरतील, त्यांचीही अशीच अवस्था होऊ शकते. भले ते ३६ धावांवर ऑलआऊट होणार नाहीत, पण ते ८०-९० धावांवर ऑलआऊट होऊ शकतात." गावस्कर यांनी पुढे सांगितले की, " ऑस्ट्रेलियाच्या जोश हेझलवूड आणि पॅट कमिन्स यांनी भेदक गोलंदाजी केली. पण त्यापूर्वी मिचेल स्टार्कने जो तीन षटकांचा स्पेल टाकला तो भन्नाट होता. त्यामुळे भारतीय फलंदाजांना सर्वस्वी दोष देऊन चालणार नाही. जर अशी गोलंदाजी झाली तर प्रत्येक संघाला संघर्ष हा करावाच लागेल." भारताने शुक्रवारी जेव्हा पाच झेल सोडले होते, तेव्हाही गावस्कर यांनी टीका केली होती. भारतीय संघ ऑस्ट्रेलियाच्या संघाला ख्रिसमसचे गिफ्ट देत आहेत, अशी टीका गावस्कर यांनी त्यावेळी केली होती. भारताविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात यजमान ऑस्ट्रेलियाने शानदार ८ विकेटनी विजय मिळवला. दुसऱ्या डावात भारतीय फलंदाजांनी लोटागंण घातल्याने ऑस्ट्रेलिया समोर विजयासाठी फक्त ९० धावांचे आव्हान होते. या विजयासह ऑस्ट्रेलियाने चार सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. दुसऱ्या डावात भारताची दाणादाण उडवणारे जोश हेजलवूड आणि पॅट कमिन्स हे ऑस्ट्रेलियाच्या विजयाचे शिल्पकार ठरले. कसोटी क्रिकेटच्या इतिहासात ही दुसरी वेळ आहे जेव्हा एखाद्या संघातील एकाही फलंदाजाला दुहेरी धावसंख्या करता आली नाही. याआधी १९२४ साली दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड यांच्यात झालेल्या कसोटी सामन्यात आफ्रिकेचा ३० धावांवर ऑल आउट झाला होता. तेव्हा आफ्रिकेच्या संघातील सर्वाधिक धावसंख्या ७ इतकी होती. त्या सामन्यात ३० धावांमध्ये ११ धावा या अतिरिक्त धावा होत्या. १९२४ नंतर २०२० साली भारतीय संघाने आज ऑस्ट्रेलिया विरुद्ध अशी नकोशी कामगिरी केली. भारताला फक्त ३६ धावा करता आल्या आणि मयांक अग्रवालने सर्वाधिक ९ धावा केल्या. कसोटी क्रिकेटमध्ये एका डावातील सर्वात कमी धावसंख्येचा विचार केल्यास १९७४ साली इंग्लंड विरुद्ध भारताचा ४२ धावसंख्येवर ऑल आउट झाला होता. त्याआधी ऑस्ट्रेलिया विरुद्ध १९७४ साली भारताचा डाव ५८ धावांवर संपुष्ठात आला होता. आज विराट आणि कंपनीने हा विक्रम मोडला. कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील ही सातव्या क्रमांकाची निचांकी धावसंख्या ठरली आहे.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3nBPHlj
No comments:
Post a Comment