सिडनी, : भारताचा युवा सलामीवीर पृथ्वी शॉ हा सध्याच्या घडीला वाईट फॉर्ममध्ये आहे. पहिल्या कसोटी सामन्यात पृथ्वीला फक्त सहा चेंडू खेळता आले होते आणि त्याला चारच धावा करता आल्या होत्या. पण जर पृथ्वीला हा धावांचा दुष्काळ संपवायचा असेल, तर भारताचा माजी खेळाडू मोहम्मद कैफने एक चांगला प्लॅन सांगितला आहे. त्याचबरोबर कैफने यावेळी पृथ्वीला भारताचा माजी महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर आणि राहुल द्रविड यांचेही दाखले दिले आहेत. भारताचा माजी क्रिकेटपटू मोहम्मद कैफने यावेळी पृथ्वीला मदत करण्यासाठी एक प्लॅन सांगितला आहे. पृथ्वी हा आयपीएलध्ये दिल्ली कॅपिटल्सच्या संघात होता. कैफ हा या संघाचा सहाय्यक प्रशिक्षक होता. त्यामुळे कैफ हा पृथ्वीला चांगलाच ओळखतो. त्यामुळे पृथ्वीला जर धावांचा दुष्काळ संपवायचा असेल तर कैफने त्याला एक खास सल्ला दिला आहे. कैफ यावेळी म्हणाला की, " मी खेळाडूंना जास्त त्रास देत नाही, पण जेव्हा खेळाडू अडचणीत सापडतो तेव्हा त्याने प्लॅनिंग कशी करायला हवी आणि कसा विचार करायला हवा, याबाबत नक्कीच सांगतो. जेव्हा खेळाडू चांगल्या फॉर्मात नसतो आणि त्याच्याकडून जास्त धावा होत नसतात तेव्हा त्याने नेट्समध्ये जास्त सराव करणे महत्वाचे आहे. सचिन आणि द्रविडसुद्धा नेट्समध्ये जास्त वेळ सराव करायचे आणि त्याचाच त्यांना फायदा झाला. त्यामुळे पृथ्वीनेही यावेळी नेट्समध्ये फलंदाजीचा जास्त सराव करायला हवा, असे मला वाटते." कैफ पुढे म्हणाला की, "' नेट्समध्ये सराव करत असताना नवीन चेंडूने पृथ्वी जास्त सराव करायला हवा. त्याचबरोबर आपण आतापर्यंत कोणत्या चेंडूवर आऊट झालो तसेच चेंडू गोलंदाजांना नेट्समध्ये टाकायला सांगायला हवे. त्याचबरोबर तुम्हाला शारीरिक आणि मानसीक फिटनेसवरही जास्त लक्ष केंद्रीत करायला हवे. कारण ही ट्रेनिंगही सर्वात महत्वाची असते. पहिल्या कसोटी सामन्यात मिचेल स्टारर्क आणि पॅट कमिन्स यांनी ज्यापद्धतीने पृथ्वीला बाद केले, त्याच्यावर सखोल विचार करायला हवा." पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय संघाला मानहानीकारक पराभव पत्करावा लागला. या सामन्यानंतर सर्वाधिक ट्रोल झाला तो भारताचा युवा सलामीवीर पृथ्वी शॉ. कारण या सामन्यात पृथ्वीला दोन्ही डावांत फक्त चारच धावा करता आल्या. त्यामुळे पृथ्वीला दुसऱ्या कसोटी सामन्यात संघात स्थान द्यावे की नाही, याबाबत भारताचे माजी कर्णधार आणि समालोचक सुनील गावस्कर यांनी आपले स्पष्ट मत व्यक्त केले आहे. यावेळी गावस्कर म्हणाले की, " भारतीय संघाने पहिल्या सामन्यातील पराभव विसरुन सकारात्मक सुरुवात करायला हवी. कारण भारताने फक्त एकच सामना गमावला आहे, पण त्यांनी चांगली कामगिरी केली तर ते ही मालिकाही जिंकू शकतील. त्यामुळे भारतीय संघात काही महत्वाचे बदल करायला हवेत. माझ्यामते दुसऱ्या सामन्यात पृथ्वी शॉला संधी देण्यात येऊ नये. पृथ्वीच्या जागी लोकेश राहुलला संधी देण्यात यावी. भारताला जर चांगली सुरुवात मिळाली तर ते हा सामना जिंकू शकतील."
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3nzKJpc
No comments:
Post a Comment