
चेन्नई, : भारताविरुद्धचा आपला पहिला कसोटी सामना खेळत असताना इंग्लंडच्या खेळाडूंनी आपल्या टी-शर्टवर काळी फित बांधल्याचे पाहायला मिळाले. त्यावेळी काही जणांना वाटले की, भारतामध्ये सुरु असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाबाबत इंग्लंडच्या संघाने काळी फित बांधली आहे की काय? पण याबाबतचा खुलासा आता इंग्लंडच्या संघाकडूनच करण्यात आला आहे. भारताविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात इंग्लंडच्या संघाने काळी फित का बांधली, याचे उत्तर इंग्लंडच्या संघाचे मीडिया मॅनेजर यांनी दिले आहे. या काळ्या फितीबद्दल त्यांनी सांगितले की, " दुसऱ्या महायुद्धामध्ये ब्रिटीश सेनाचे कॅप्टन टॉम मूर हे होते. त्यांनी या महायुद्धात मोलाची भूमिका बजावली होती. त्याचबरोबर करोनाविरुद्धही त्यांनी लढाई दिली होती. टॉम यांना करोनाची बाधा झाली होती आणि त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. पण वयाच्या १००व्या वर्षी त्यांचे निधन झाले. त्यामुळे टॉम यांचा सन्मान करण्यासाठी इंग्लंडच्या क्रिकेटपटूंनी भारताविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात टी-शर्टवर काळी फित बांधली आहे." भारत आणि इंग्लंड यांच्यात आजपासून पहिल्या कसोटी सामन्याला सुरुवात झाली. इंग्लंडचा कर्णधार जो रुट आज आपला शंभरावा कसोटी सामना खेळत आहे. त्यामुळे सामना सुरु होण्यापूर्वी रुटचा सत्कार करण्यात आला. पण शंभरावा कसोटी सामना खेळत असताना रुटने एक अनोखा विश्वविक्रम रचला आहे. आतापर्यंत क्रिकेट विश्वात ही गोष्ट कोणत्याही क्रिकेटपटूला करता आलेली नाही. रुट हा जगातील असा एकच क्रिकेटपटू आहे की, ज्याचे सर्व महत्वाचे सामने हे भारतात खेळले गेले. रुटने २०१२ साली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण नागपूरमध्ये केले होते. या सामन्यात रुटने ७३ धावांची खेळी साकारली होती. त्यानंतर रुट आपला ५०वा सामनाही भारतामध्येच खेळला. २०१६ साली रुट आपला ५०वा सामना विशाखापट्टणम येथे खेळला होता. त्यानंतर आता आपला शंभरावा कसोटी सामना रुट चेन्नईमध्ये खेळत आहे. या सामन्यातील पहिल्या डावात रुटने आतापर्यंत आपले शतक साजरे केले आहे. पण भारतामध्ये पहिला, ५०वा आणि शंभरावा कसोटी सामना खेळणारा रुट हा क्रिकेट विश्वातील पहिलाच परदेशी खेळाडू ठरला आहे.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3twsm8b
No comments:
Post a Comment