अहमदाबाद, : भारतीय संघाने या कसोटीच्या पहिल्या दिवशीच इंग्लंडच्या संघाला खुर्दा उडवला. पहिल्या डावात इंग्लंडला सर्व बाद करत भारताने यावेळी उत्तम गोलंदाजीचा वस्तुपाठ दाखवला. त्याचबरोबर रोहित शर्माने यावेळी अर्धशतक झळकावत संघाच्या धावसंख्येला चांगला आकार दिला. त्यानंतर पहिल्या दिवसअखेर भारताची ३ बाद ९९ अशी स्थिती आहे. भारतीय संघ अजूनही १३ धावांनी पिछाडीवर आहे. इंग्लंडच्या ११२ धावांचा पाठलाग करताना भारतीय संघाची सुरुवात आश्वासक झाली नाही. इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरने यावेळी भारताचा सलामीवीर शुभमन गिलला बाद केले. गिलला यावेळी ११ धावांवर समाधान मानावे लागले. त्यानंतर पुढच्याच षटकात चेतेश्वर पुजाराही बाद झाला. पुजाराला यावेळी आपले खातेही उघडता आले नाही. पण त्यानंतर रोहित शर्माने दमदार फलंदाजी करत आपले अर्धशतक पूर्ण केले. त्यामुळेच भारताला पहिल्या दिवशी चांगली धावसंख्या उभारता आली. भारताचा फिरकीपटू अक्षर पटेलने आज भेदक गोलंदाजी करत इंग्लंडचा अर्धा संघ माघारी धाडला. इंग्लंडला यावेळी प्रथम फलंदाजी करताना फक्त ११२ धावाच करता आल्या. इशांत शर्माने तिसऱ्याच ओव्हरमध्ये इंग्लंडला पहिला धक्का दिला. त्याने डॉमनिक सिबलीला शून्यावर बाद केले. त्यानंतर जॉनी बेयरस्टोला अक्षरने शून्यावर बाद करून इंग्लंडची अवस्था २ बाद २७ केली. बेयरस्टो बाद झाल्यानंतर मैदानावर आलेल्या जो रूटने क्रॉली सोबत ४७ धावांची भागिदारी केली. ही जोडी इंग्लंडला सावरेल असे वाटत असताना अश्विनने रुटची विकेट घेतली. त्यानंतर पहिले सत्र संपल्याआधी अक्षरने क्रॉलीला ५३ धावांवर बाद केले. दुसऱ्या सत्रात इंग्लंडची आणखी वाइट अवस्था झाली. ८१ धावांवर त्यांच्या दोन विकेट पडल्या. ओली पोपला अश्विनने तर अक्षरने बेन स्टोक्सला बाद केले. भारतीय गोलंदाजांनी इंग्लंडच्या तळातील फलंदाजांना मोठी धावसंख्या उभी करू दिली नाही. जोफ्रा आर्चरला अक्षरने, जॅक लीचला अश्विनने बाद केले आणि पाहूण्यांची अवस्था ८ बाद ९८ अशी केली. अखेर च्या दोन फलंदाजांना झटपट बाद करून भारताने इंग्लंडला फक्त ११२ धावांवर रोखले. भारताकडून अक्षर पटेलने सलग दुसऱ्या कसोटीत पाच विकेट घेतल्या. त्याने ३८ धावात ६ विकेट घेतल्या. तर आर अश्विनने २६ धावात ३ विकेट घेतल्या.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3dEHQRX
No comments:
Post a Comment