अहमदाबाद, : कसोटी मालिकेनंतर भारत आणि इंग्लंड यांच्यामध्ये ट्वेन्टी-२० सामन्यांची मालिका होणार आहे. या मालिकेसाठी भारताच्या संघातील एक खेळाडू बाहेर होऊ शकतो आणि त्यामुळे भारतीय संघाला अजून एक धक्का बसू शकतो. इंग्लंडविरुद्धच्या ट्वेन्टी-२० मालिकेसाठी भारताचा संघ यापूर्वीच जाहीर करण्यात आला आहे. या मालिकेसाठी निवडण्यात आलेल्या खेळाडूंची फिटनेस चाचणी बीसीसीआय घेत आहे. पण भारताचा एक खेळाडू या फिटनेस चाचणीत नापास झाल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे या खेळाडूला संघातून वगळण्यात येऊ शकते, असे म्हटले जात आहे. गेल्या आयपीएलमध्ये केकेआरकडून खेळणाऱ्या वरुण चक्रवर्तीने कमाल केली होती. त्यामुळे त्याला ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यासाठीही निवडण्यात आले होते. पण त्यावेळी वरुणच्या खांद्याला दुखापत झाली होती. त्यामुळे तो ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर जाऊ शकला नव्हता. पण आता इंग्लंडविरुद्धच्या ट्वेन्टी-२० मालिकेसाठी पुन्हा एकदा त्याची निवड करण्यात आली होती. पण बीसीसीआयच्या फिटनेस चाचणीमध्ये वरुण नापास ठरला आहे. त्यामुळे आता वरुणला भारताच्या ट्वेन्टी-२० संघातून डच्चू मिळू शकतो, असे म्हटले जात आहे. बीसीसीआयचे फिटनेस टेस्ट पास करण्याचे नियम काय आहेत, पाहा... भारताच्या खेळाडूंना बीसीसीआयच्या नियमांप्रमाणे दोन प्रकारच्या फिटनेस चाचण्या द्यावा लागतात. यामध्ये २ किलोमीटर ठराविक मिनिटांमध्ये धावण्याचा एक नियम आहे. पण जर खेळाडू या नियमामध्ये बसत नसेल किंवा त्या खेळाडूला या चाचणीत पास होता आले नाही, तर त्यासाठी अजून एक चाचणी असते. यो-यो फिटनेस टेस्ट, असे या चाचणीचे नाव आहे. या चाचणीमध्ये खेळाडूला १७.१ एवढा स्कोर करावा लागतो. जर खेळाडू या दोन्ही फिटनेस चाचण्यांमध्ये नापास झाला तर त्याला भारतीय संघात प्रवेश दिला जात नाही. यापूर्वी मुंबई इंडियन्सच्या इशान किशनचीही फिटनेस चाचणी घेण्यात आली होती. त्यानंतर किशनची भारताच्या ट्वेन्टी-२० संघात निवड करण्यात आली होती. किशनबरोबरच संजू सॅमसन, जयदेव उनाडकट आणि सिद्धार्थ कौल यांचीही फिटनेस चाचणी बीसीसीआयने घेतली होती.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3bJYPQd
No comments:
Post a Comment