चेन्नई, : धडाकेबाज अष्टपैलू ग्लेन मॅक्सवेलचे उद्याच्या लिलावात काय होणार, याकडे सर्वांच्या नजरा लागलेल्या आहेत. कारण पंजाबच्या संघाने त्याला मोठ्या किमतीला विकत घेतले होते. पण गेल्या हंगामात मॅक्सवेल पूर्णपणे अपयशी ठरला होता. त्यामुळे मॅक्सवेलला पंजाबने रिलीज केले होते. आता लिलावात मॅक्सवेलला कोणत्या संघाने स्थान द्यावे, याबाबत भारताचा माजी सलामीवीर आणि खासदार गौतम गंभीरने आपले मत व्यक्त केले आहे. गंभीर म्हणाला की, " जर विराट कोहली आणि एबी डिव्हिलियर्सवरचा दबाव कमी करायला असेल तर आरसीबीच्या संघाने मॅक्सवेलला स्थान द्यायला आहे. त्याचबरोबर विराट कोहलीने संघासाठी सलामीला यायला हवे. पण कोहली आणि संघ व्यवस्थापन यांचा निर्णय नेमका काय होतो, यावर सर्व काही अवलंबून असेल. कोहलीने देवदत्त पडीक्कलबरोबर जर सलामी दिली, तर त्याच्याकडे डिव्हिलियर्स आणि मॅक्सवेल असे दोन पर्याय असतील. मॅक्सवेलची कामगिरी बंगळुरुच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर चांगली होऊ शकते, असे मला वाटते. त्यामुळे मॅक्सवेलला यावेळी आरसीबीच्या संघाने स्थान द्यावे, असे मला वाटते." गंभीर पुढे म्हणाला की, " सध्याच्या घडीला पंजाबच्या संघाकडे मोहम्मद शमी सोडला तर चांगला वेगवान गोलंदाज नाही. त्यामुळे पंजाबच्या संघासाठी यावेळी उमेश यादव, ख्रिस मॉरिस किंवा कायले जेमिन्सन हा चांगला पर्याय असू शकतो. उमेश यादवला संघात घेणे ही पंजाबसाठी नक्कीच चांगली गोष्ट असेल. शमी आणि उमेश नव्या चेंडूचा चांगला वापर करु शकतात. त्याचबरोबर मॉरिस आणि जेमिन्सन हे मधली षटकं चांगली टाकू शकतात." पंजाबला एकदा उपविजेतेपद तर एकदा तिसऱ्या स्थानापर्यंत पोहोचले आहेत. १४व्या हंगामात हा संघ एका नव्या नावासह मैदानात उतरेल. बीसीसीआयमधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पंजाब संघ मोठ्या कालावधीपासून नावात बदल करण्याचा विचार करत होता. हा निर्णय अचानक घेतलेला नाही. या आयपीएलच्या आधी बदल करणे योग्य वाटले. मोहित बर्मन, नेस वाडिया, प्रिती झिंटा आणि करण पॉल हे या संघाचे मालक आहेत. गेल्या हंगामात पंजाबने केएल राहुलकडे संघाचे नेतृत्व दिले होते. या संघाचे प्रशिक्षक अनिल कुंबळे आहेत.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3s0SEO1
No comments:
Post a Comment