चेन्नई : मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मावर आता एका सामन्याच्या बंदीची शक्यता ओढावू शकते. रोहित शर्माकडून गेल्या सामन्यात एक चुक झाली असून यापुढील सामन्यांमध्ये त्याच्यावर नियमांनुसार एका सामन्याची बंदी येऊ शकते. दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या सामन्यात षटकांची गती संथ राखल्याबद्दल रोहित शर्माला १२ लाखांचा दंड ठोठावण्यात आला. त्यामुळे आयपीएलच्या नियमांनुसार येत्या काही सामन्यांमध्ये जर रोहितकडून अशीच चुक होत राहिली तर नक्कीच रोहित शर्मावर एका सामन्याची बंदी येऊ शकते. काय आहे आयपीएलचा नियम, जाणून घ्या...कोणत्याही संघाने जर षटकांची गती संथ राखली तर त्यांच्यावर कारवाई होते. कोणत्याही संघाकडून पहिल्यांदा ही चुक घडली तर कर्णधाराच्या मानधनातून १२ लाख एवढी रक्कम दंड स्वरुपात आकारली जाते. त्यानंतर जर हीच चुक पुन्हा एकदा घडली तर कर्णधाराला २४ लाखांचा दंड ठोठावला जातो आणि त्याचबरोबर संघातील प्रत्येक खेळाडूच्या मानधनातून सहा लाख रुपये किंवा मानधनाच्या २५ टक्के यांच्यामधील जी रक्कम कमी असेल, तेवढा दंड ठोठावला जातो. जर एखाद्या संघाकडून जर तिसऱ्यांदा षटकांची गती संथ राखण्याचीी चुक घडली तर कर्णधारावर एका सामन्याची बंदी येते आणि त्याला ३० लाख रुपयांचा दंड भरावा लागतो. त्याचबरोबर कर्णधार वगळता अन्य खेळाडूंना १२ लाख रुपये किंवा मानधनाच्या ५० टक्के यांच्यामधील जी रक्कम कमी असेल, तेवढा दंड ठोठावला जातो. जर संघाला आपल्या कर्णधारावरील बंदी आणू द्यायची नसेल तर त्यांना नेतृत्व बदलावे लागते. पण त्याबाबतचे पत्र त्यांना बीसीसीआयला द्यावे लागते आणि बीसीसीआयने या गोष्टीला परवानगी दिल्यावरच कोणत्याही संघाला आपला कर्णधार बदलता येऊ शकतो आणि त्याच्यावरील बंदीची तलवार येऊ शकत नाही. त्यामुळे आता रोहित शर्माला मुंबई इंडियन्सचा संघ गोलंदाजी करत असताना फार काळजी घ्यावी लागणार आहे. कारण यापुढे जर पुन्हा दोनदा अशी चुक झाली तर रोहितवर एका सामन्याची बंदी येऊ शकते आणि ही मुंबई इंडियन्ससाठी धोक्याची घंटा ठरू शकते.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3gxeCWv
No comments:
Post a Comment