
चेन्नई : एकेकाळी क्रिकेटची खेळपट्टी बनवणारा मजूर आता आयपीएलचा सुपर स्टार झाल्याचे पाहायला मिळाले आहे. संघर्षाच्या काळात या खेळाडूला मजूरी करावी लागली होती. क्रिकेटची खेळपट्टी बनवण्यासाठी तो मजूरी करुन काही पैसे कमावत होता. पण क्रिकेट खेळण्याचे वेड त्याला लहानपणापासून होते. अखेर त्याने आपले स्वप्न साकार केले आणि आता तो आयपीएलचा सुपरस्टार ठरला आहे. लहाणपणापासून आयपीएलमधील पंजाब किंग्सचा सुपरस्टार खेळाडू रवी बिश्नोईला () क्रिकेटचे वेड होते. पण घरची परिस्थिती बेताचीच होती. त्यामुळे क्रिकेट खेळण्यासाठी त्याला कोणतीही मदत घरातून मिळत नव्हती. पण त्याने हार मानली नाही. क्रिकेट खेळण्यासाठी कोणतीही गोष्ट करायला तो तयार होता. त्यामुळे त्याने क्रिकेटचे पीच बनवण्यासाठी मजुरीही केली. याबाबत रवीने सांगितले की, " जोधपूरमध्ये माझे प्रशिक्षक प्रद्योत सिंग राठोड आणि शाहरुख पठाण यांनी मिळून एक क्रिकेट अकादमी सुरु करण्याचे ठरवेल होते. त्यावेळी आमच्याकडे पैसेही नव्हते. त्यामुळे खेळपट्टी बनवण्यासाठी लागणाऱ्या विटा आणि सिमेंटच्या गोणी मी उचलल्या होत्या. ते दिवस अजूनही मला आठवतात. त्याचबरोबर राजस्थान रॉयल्स संघासाठी ट्रायल देण्यासाठी मी बारावीच्या परीक्षेलाही गेलो नव्हतो. त्यावेळी मला राजस्थानच्या संघाने निवडले नव्हते. पण मी हार मानली नाही आणि खेळत राहीलो." गेल्यावर्षी पंजाबच्या संघाकडून खेळणाऱ्या रवीचे कर्णधार लोकेश राहुलने कौतुक केले होते. आपल्या पदार्पणाच्या सामन्यात रवीने एकाच षटकात दोन विकेट्स मिळवल्या होत्या. याबाबत रवीने सांगितले की, " कर्णधार लोकेश राहुल हा नेहमीच मला पाठिंबा देत आला आहे. त्याचबरोबर पंजाबच्या संघाचे प्रशिक्षक अनिल कुंबळे आणि १९-वर्षांखालील संघाचे प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्या टिप्सचा मला चांगलाच फायदा झाला आहे. नेट्समध्ये सराव करत असताना मला ख्रिस गेलसारख्या धडाकेबाज फलंदाजाला गोलंदाजी करता आली. त्याचबरोबर निकोलस पुरन आणि लोकेश राहुल यांनाही मी गोलंदाजी करू शकलो. जर नेट्समध्ये मी चांगली गोलंदाजी करत असेन आणि गेलसारख्या दिग्गज खेळाडूचा सामना करत असेन तर नक्कीच मैदानातही माझी कामगिरी चांगली होईल, असा मला विश्वास होता. त्यामुळेच माझ्यावरचे दडपण कमी झाले आणि मी चांगली कामगिरी करू शकलो."
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3mlNvi3
No comments:
Post a Comment